नाट्यसंगीत, सुगम संगीताने सजला ‌‘स्वरयज्ञ'

    03-Apr-2025
Total Views |
 
 nat
पुणे, 2 एप्रिल (आ.प्र.) :
 
बंदिश व उपशास्त्रीय गायनासह नाट्यसंगीत, भक्तिसंगीत आणि सुगम संगीत असे तिन्ही प्रकार पुणेकरांनी एकाच रंगमंचावर अनुभवले. पं. शौनक अभिषेकी, पं. रघुनंदन पणशीकर, मंजूषा पाटील व सहकाऱ्यांनी नाट्यसंगीत, लोकसंगीत व भावसंगीताचा प्रवास रसिकांसमोर उलगडत भारतीय संगीत परंपरेची अनुभूती स्वरयज्ञाद्वारे दिली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनानिमित्त गुढी पाडव्यापासून बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेच्या प्रांगणात संगीत महोत्सव आयोजिण्यात आला आहे.
 
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पं. अभिषेकी, पं. पणशीकर, मंजूषा पाटील व सहकाऱ्यांची सुरेल मैफल आयोजिण्यात आली होती. हंसध्वनी रागातील गणेश स्तुतीने पं. पणशीकर यांनी स्वरयज्ञाचा प्रारंभ केला. त्यानंतर सादर झालेल्या जानकी नाथ सहाय करे.. या पं. पणशीकर यांच्या भजनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. मंजूषा पाटील यांनीही बंदिश आणि उपशास्त्रीय गायन सादर केले. पं. अभिषेकी यांनी आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गुरुजी में तो एक निरंजन... या अभिषेकी यांनी सादर केलेल्या रचनेला रसिकांनी भरभरून दाद दिली. अभेद अभिषेकी, देवर्षी दंडवते, राज शहा यांच्यासह प्रशांत पांडव (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनियम), अपूर्व द्रविड (साइड रिदम), दिलीप तिकोणकर (पखावज) यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले.