पुणे, 2 एप्रिल (आ.प्र.) :
तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन प्रयोग करीत असलेल्या विद्यार्थ्यांचे चारशे प्रकल्प पुण्यात आयोजिण्यात येणाऱ्या ‘डिपेक्स प्रदर्शन-2025'मध्ये मांडण्यात येणार आहेत. सीओईपी मैदानात तीन ते सहा एप्रिलदरम्यान भरणाशया या प्रदर्शनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील प्रदर्शनाला भेट देणार आहेत. विद्यार्थ्यांनी बनवलेले नवीन संशोधन, प्रकल्प आणि तांत्रिक नवकल्पना यांचा आविष्कार या प्रदर्शनात दिसेल. 1986 पासून हे प्रदर्शन आयोजिण्यात येत आहे. डिपेक्ससाठी अकरा थीम निवडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भाग घेतलेल्यांपैकी सर्वो त्कृष्ट प्रकल्पांना प्रथम व द्वितीय पुरस्कार दिले जातील. डिपेक्समध्ये नऊ परिसंवाद होणार आहेत. त्यामध्ये नामांकित उद्योजक सहभागी होतील.
या वर्षीच्या 34व्या डीपेक्समध्ये महाराष्ट्र व गोवा राज्यातून एकूण 2003 प्रोजेक्ट्स सहभागी झाले होते. यामधून 11 विभागात झालेल्या प्राथमिक फेरीतून निवडलेल्या सर्वोत्तम 400 प्रकल्पांचे भव्य प्रदर्शन पुण्यात केले जाईल. डिपेक्स-2025 स्वागत समितीचे अध्यक्ष प्रकाश धोका, कुलगुरू सुनील भिरुड, स्वागत समिती सचिव प्रसेनजित फडणवीस, रवींद्र शिंगणेकर, स्वागत समितीचे कार्याध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, डॉ. प्रशांत साठे, अभाविपचे अथर्व कुलकर्णी हे पत्रकार परिषदेला उपस्थित होते. प्रकाश धोका म्हणाले की, भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्राला दिशा देणारे डिपेक्स या वर्षी पुण्यात पार पडत आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये डिपेक्सने विद्यार्थ्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
प्रसेनजित फडणवीस म्हणाले की, हा डिपेक्स महाराष्ट्र व गोवा राज्यातील निवडक प्रकल्पांचा एक महाकुंभ आहे. याच मैदानावर बारा वर्षांपूर्वी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या उपस्थितीमध्ये डिपेक्स पार पडला होता. या डिपेक्समध्ये खऱ्या अर्थाने समाजाभिमुख विषयांवर विज्ञान, तंत्रज्ञान भूमिका व शाश्वत विकास याबाबत विचारमंथन होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, डीआरडीओचे माजी अध्यक्ष जी. सतीश रेड्डी, एआयसीटीई चेअरमन टी. जी. सीतारामन, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती-तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री डॉ. वीरेंद्र सिंह सोलंकी हेही प्रदर्शनाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.