पुणे, 1 एप्रिल (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
सोमवारी मध्यवर्ती बाजारपेठ बंद असताना बाजीराव रस्त्यावर नेहमीप्रमाणे दोन्ही बाजूला अगदी दुचाकीपासून चारचाकी वाहने सर्रास पार्क केलेल्या होत्या. एवढेच नव्हे, तर नूमवि शाळेसमोरील दुकानांच्या पुढे डबल पार्किंग करून मोटारी उभ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे सार्वजनिक सुट्टी असतानाही बाजीराव रस्त्यावरील वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले. शहराच्या मध्यवर्ती शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी स्थानिक कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांनी या दोन्ही रस्त्यांच्या खालून अनुक्रमे स्वारगेट आणि सारसबागेपर्यंत भुयारी मार्ग तयार करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या मागणीवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्याचे आश्वासन देत या मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी हिरवा कंदीलही दाखविल्याचे रासने यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
हजारो कोटी रुपये खर्चाची आणि अनेक तांत्रिक अडचणी असलेली भुयारी मार्गाची संकल्पना प्रत्यक्षात अमलात आणायची झाल्यास दीर्घ कालावधी लागणार आहे. तोपर्यंत आहे त्या रस्त्यांवरील अतिक्रमणे, बेकायदा पार्किंगचे नियोजन करून वाहतूक गती करण्यासाठी प्राथमिकता द्यावी लागणार आहे. या रस्त्यांवर अतिक्रमणे आणि बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे देखील रासने यांनी जाहीर केले आहे; परंतु या घोषणांवर कार्यवाहीसाठी अद्याप कुठलेही पाऊल उचलल्याचे आजच्या या रस्त्यांवरील स्थितीतून दिसून आले. सोमवारी शहरातील तुळशीबागेसह मध्यवर्ती बाजारपेठ बंद असते; तसेच शाळांनाही सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे येथील रस्त्यांवर रोजपेक्षा वाहतूक कमीच होती.
विशेषत: बाजीराव रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण कमी होते. मात्र, अगदी टेलिफोन एक्सचेंजपासून अगदी शनिवारवाड्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क केल्याचे दिसून आले. या रस्त्यावर अगदी अत्रे सभागृहापासून शनिवारवाड्यापर्यंत दोन्ही बाजूला फक्त व्यापारी आस्थापना आहेत. त्यामुळे ग्राहकांसोबतच व्यावसायिकांची वाहने रस्त्यांवर असतात. यामध्ये अगदी दुचाकींपासून मोटारी आणि मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोंचाही समावेश आहे. पैकी ठराविक ठिकाणीच नो-पार्किंग; तसेच सम-विषम पार्किंग करण्यात आले आहे. त्यामुळे देखील बिनधास्तपणे वाहने उभी केली जातात.
पूर्वी वाहतुकीसाठी दुहेरी असलेला शिवाजी आणि बाजीराव रस्ता साधारण दोन दशकांपूर्वी एकेरी करण्यात आला आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे हे दोन्ही रस्ते आता कायमच कोंडीत अडकलेले असतात. मात्र, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी हे रस्ते ज्या ठिकाणी अरुंद आहेत तेथे नो-पार्किंग करणे, सम-विषम पार्किंग करणे, येथील पदपथ बॅरिकेडिंग करून फक्त पादचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देणे, या रस्त्यांना जोडणाऱ्या अंतर्गत गल्ल्यांतील रस्ते एकेरी करणे, या जोडरस्त्यांवर निर्माण होणाऱ्या चौकातील सर्वच रस्त्यांवर चौकांपासून पन्नास मीटरपर्यंत नो-पार्किंग झोन करणे अशी कुठलीही उपाययोजना वाहतूक पोलिसांनी केलेली नाही. तसेच आतापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधीने सार्वजनिक हित पाहून त्यावर उपाययोजना सुचविण्यास पुढाकार घेतला नाही. त्यामुळे यामागे काही आर्थिक गणिते तर नाहीत ना, असा संशय येण्यास वाव आहे. सध्याची परिस्थिती पाहता हजारो कोटी रुपयांचे भुयारी मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात येईपर्यंत रोजच्या धकाधकीतून सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीत अडकून पडू लागू नये यासाठी वाहतूक पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.