महावितरणकडून 25 हजारांवर थकबाकीदारांची वीज खंडित

    28-Mar-2025
Total Views |

 mah
पुणे, 27 मार्च (आ.प्र.) :
 
वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे पुणे परिमंडलात गेल्या 24 दिवसांत 25434 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सध्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे अद्यापही 88 कोटी 45 लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी तीव्र करण्यात आली आहे. थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसुलीवरच आहे. वीजबिलांच्या वसुलीतूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसुलीला मोठा वेग देण्यात आला आहे. मुख्य अभियंता राजेंद्र पवार स्वतः परिमंडलात विविध ठिकाणी दौरे करून शाखा कार्यालयांपर्यंत थकबाकी वसुलीचा आढावा घेत आहेत.
 
थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी अधीक्षक अभियंते युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले (प्र.) यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते व इतर अधिकारी, कर्मचारी सध्या ‌‘ऑन फिल्ड' आहेत. पुणे शहरात एकूण घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 40 कोटी 9 लाखांची थकबाकी आहे. गेल्या 24 दिवसांमध्ये 10177 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. पिंपरी चिंचवड शहरात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 18 कोटी 40 लाखांची थकबाकी आहे. त्यातील 7796 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच, ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, राजगड, हवेली तालुक्यांत घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडे 29 कोटी 96 लाखांची थकबाकी आहे. त्यातील 7461 ग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या 24 दिवसांत खंडित करण्यात आला. ग्राहकांनी थकबाकीचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.