हुतात्मा दिनानिमित्त चिंचवडमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

    28-Mar-2025
Total Views |
 
hu
 
पिंपरी, 27 मार्च (आ.प्र.) :
 
गडकिल्ले सेवा संस्था, महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने ‌‘हुतात्मा दिना' निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 75 रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. ‌‘गडकिल्ले सेवा संस्थे'च्या वतीने 23 मार्च हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या दिवशी स्वातंत्र्यासाठी फासावर चढलेल्या भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या थोर क्रांतिकारकांची आठवण ठेवण्यासाठी आणि नव्या पिढीस त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी संस्थेच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जातात. याचाच एक भाग म्हणून चिंचवडमधील मोरया गोसावी क्रीडा संकुलातील संस्थेच्या पु.ल.देशपांडे ग्रंथालयाच्या आवारात संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक राजेंद्र गावडे व पुणे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विजयजी पारगे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
संतोष घुले यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ॲड. अजय सोनवणे यांनी ‌‘23 मार्च हुतात्मा दिन' ही संकल्पना सांगितली. अनिल दुधाणे यांनी पाहुण्यांचे शिवप्रतिमा देऊन आभार मानले. ब. ही. चिंचवडे व श्रीहरी तापकीर यांनी रक्तदात्यांना रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र वितरित केले. गडकिल्ले सेवा संस्थेचे मनोज काकडे, नीलेश गावडे, रविराज फुगे, हितेश पवार, प्रांजल केळकर, सिद्धी गावडे, भारत भालशंकर, कण्व पवार, हनुमंत भोईर, जयंत फाळके यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले. चिंचवड वृत्तपत्र संघटनेचे सुनील सुरवसे व सतीश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते या शिबिरात उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीमार्फत रक्त संकलन केले गेले.