समर्थ भारताच्या निकषांवर खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन

    27-Mar-2025
Total Views |
 
hhh
 
पुणे, 26 मार्च (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत? या विषयावर सर्व स्तरांतील नागरिकांसाठी खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था आणि कौशलम न्यास यांच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि या उपक्रमाच्या प्रमुख लीना मेहेंदळे यांनी मंगळवारी (ता. 25) भांडारकर संस्था येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. य्ाा प्रसंगी संस्थेचे मानद सचिव सुधीर वैशंपायन, माध्यम संयोजक भालचंद्र कुलकर्णी उपस्थित होते. माजी सनदी अधिकारी आणि या उपक्रमाच्या प्रमुख लीना मेहेंदळे म्हणाल्या की, विकसित राष्ट्र होण्याकडे भारताचा प्रवास सुरू असताना आपला देश आदर्श आणि समर्थदेखील झाला पाहिजे. त्या दृष्टीने 2047 पर्यंतच्या वाटचालीचे नियोजन, संकल्प आणि आपले निकष काय असावेत, या संदर्भात ही निबंध स्पर्धा आहे.
 
आदर्श आणि समर्थ भारत घडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात काही निकष आहेत. त्ो निकष निवडून निबंधलेखन करायचे आहे. निबंध लेखन मराठी, हिंदी, गुजराथी, तेलुगु आणि कोकणी या 5 भाषांमध्ये करायचे आहे. संस्कृतमध्ये निबंध लेखन केले तरीही स्वीकारण्यात येईल. निबंध स्पर्धेसाठी सर्वसामान्य नागरिकांना 3 हजार शब्दांची मर्यादा आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी 2 हजार पाचशे शब्दांत निबंधलेखन करावे. शालेय विद्यार्थ्यांनी बाराशे शब्दांत निबंध लिहायचा आहे. या स्पर्धेकरिता 15 मेपर्यंत फेसबुक ग्रुपच्या या https: / www.facebook. com/groups/511254721726919 या लिंकवर मोफत नोंदणी करावी आणि निबंध 31 जुलैपर्यंत ऑनलाइन सादर करावेत. हस्तलिखित निबंधही स्वीकारण्यात येतील.
 
उत्कृष्ट निबंधांचे पुस्तक प्रसिद्ध करण्यात येईल; तसेच निबंधांसंबंधी गटचर्चा घेण्याचेही नियोजित आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन म्हणाले की, 2047 पर्यंत आपला भारत देश स्वतःच्या ताकदीवर बलशाली व्हावा याकरिता कोणते बदल अपेक्षित आहेत हे विचार निबंधातून लिहायचे आहेत. भारत देश शांततेचा पुरस्कार करणारा आहे. 2047 मध्ये भारत देश जगातील अन्य देशांच्या तुलनेत अग्रणी असावा, यासाठी प्रत्येकाच्या मनात काही संकल्पना असतात. त्या संकल्पना, विचार निबंधातून व्यक्त व्हावेत. उत्कृष्ट निबंधाचे एकत्रित डॉक्युमेंटेशन करण्यात येईल.