मुंबई, 26 मार्च (आ.प्र.) :
राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या विजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीजपुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विधान भवनात महापारेषण प्रकल्पांबाबतच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, आमदार दिलीप वळसे पाटील, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, ऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्ला, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंघल, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते; तसेच संबंधित जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
विविध जिल्ह्यांतील महापारेषणच्या प्रलंबित कामांचा मुख्यमंत्र्यांनी सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पालघरमध्ये अधिक कामे प्रलंबित असून, त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करून टीबीसीबी प्लॅनिंगअतंर्गत गतिशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा; तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करावे. स्थानिक राजकीय वा इतर कोणत्याही हस्तक्षेपाला न जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवर उभारणीच्या कामांना गती द्यावी. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांत पोलीस अधीक्षकांनी संरक्षण उपलब्ध करून द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांची कामे गतीने पुढे नेण्याची खबरदारी घ्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना- 2024-34 अतंर्गत 1 लाख 54 हजार 522 कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, 86656 नवीन कॉरिडॉरचे काम करण्यात येणार आहे. या संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत आभा शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली.