शाळेत झाेपा काढायला जातात

    09-Feb-2025
Total Views |
 
 

sleep 
 
दृश्य चीनमधलं आहे.आपल्याकडेही शाळेत काही मुलं तास सुरू असताना डुलक्या काढतात. काही तर इतकी गाढ झाेपतात की घाेरू लागतात. त्यांच्या घाेरण्याने इतरांना डिस्टर्ब व्हायला लागतं. तेव्हाच शिक्षकही गाढ झाेपेतून जागे हाेतात आणि त्या मुलांना जागे करतात. विनाेदाचा भाग साेडा. शाळांमध्ये डुलक्या काढण्याला आपल्याकडे काही प्रतिष्ठा नाही. एखाद्या मुलाला परीक्षेत चांगले मार्क मिळाले नाही तर त्याला बाेलणी खायला लागतात, घरातले विचारतात, शाळेत काय झाेपा काढायला जाताेस का? हा प्रश्न चीनमधल्या या मुलांना विचारण्यात पाॅइंट नाही. कारण तिथे उत्तर येईल हाे, आम्ही शाळेत झाेपायलाच जाताे.
 
म्हणजे फक्त झाेपायला नाही हाे, अभ्यास करायला आणि झाेपायला जाताे. पूर्वेकडच्या देशांमध्ये दुपारची झाेप ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. आपल्याकडेही गेल्या शतकापर्यंत वामकुक्षीला फार महत्त्व हाेतं. दुपारच्या जेवणानंतर डाव्या कुशीवर काही काळ पहुडण्याची पद्धत हाेती. ऑफिसातही मंडळी टेबलावर डाेकं टेकून किंवा खुर्चीवर मागे रेलून, डाेकं भिंतीला टेकवून दहा मिनिटांची डुलकी काढायची जेवणानंतर. चीन आणि जपान यांनी ही परंपरा जतन केली आहे.माणूस रिचार्ज हाेताे म्हणून चीनने तर लहान मुलांना शाळेत नीट झाेपता यावं, यासाठी बाकांचीही तशीच रचना केली आहे.