नागपूर जिल्ह्यातील कळमना तालुक्याच्या काठावरील उबाळी या सुमारे एक हजार उंबरठ्याच्या गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा राेजच्याप्रमाणे सकाळी सुरू झाली. शालेय प्रार्थना व पाठ हाेत असताना शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शाळेच्या पाहणीसाठी पाेहाेचले. शाळेच्या ओट्यावर शिस्तीत उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांजवळ जाऊन वडीलकीच्या नात्याने त्यांनी या मुलांची चाैकशी केली. खुद्द शालेय शिक्षण मंत्र्यांच्या या शाळा भेटीने मुख्याध्यापिका विजया गाेतमारे यत्किंचितही गाेंधळून न जाता विश्वासाने पुढे आल्या. शाळेची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. शिक्षण मंत्री तिसरीतील मुलींशी गप्पांमध्ये रमून गेले. त्यांना एक-एक प्रश्न विचारत शाळेतल्या अडचणी जाणून घेतल्या. कशिश ठाकूर ही विद्यार्थिनी मंत्र्यांनी दिलेल्या विश्वासामुळे पुढे आली. सर, मी कविता वाचून दाखवते, असे सांगून तिने कविता म्हणून दाखवली. ‘पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम् काैलारावर थेंब टपाेरे तडम् तडतड तडम्...’ ही कविता सादर करून तिने शिक्षण मंत्र्यांनाही तिसरीच्या भावविश्वात नेले. भुसे यांनी कशिशचे काैतुक केले आणि पुढच्या शाळा भेटीसाठी ते रवाना झाले.