बारामती, 7 फेब्रुवारी (आ.प्र.) :
वीजसेवेचे धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील शरीरसौष्ठव स्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली. यात कोल्हापूर परिमंडलाचे राहुल कांबळे यांनी पहिला ‘महावितरण श्री'चा किताब पटकावला. येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा अटीतटीच्या लढतींमुळे रंगतदार होत आहेत. सांघिक कामगिरीत पहिल्या दिवशी पुणे-बारामती संघाने वर्चस्व ठेवत आगेकूच सुरू केली. या स्पर्धेत यंदा प्रथमच शरीरसौष्ठव स्पर्धेचा समावेश करण्यात आला. विविध वजनी गटांत शरीरसौष्ठव स्पर्धा झाली. यात 31 कर्मचाऱ्यांनी भाग घेत आश्चर्याचा धक्का दिला.
या स्पर्धेत पिळदार शरीरयष्टीचे दमदार प्रदर्शन करत कोल्हापूरचे राहुल कांबळे यांनी ‘महावितरण श्री'चा किताब पटकावला. त्यांच्यासह विविध वजनी गटांतील विजेते व उपविजेत्यांना पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सर्वश्री धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, चंद्रमणी मिश्रा, सुनील काकडे, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके यांच्या हस्ते पदक व प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.
शरीरसौष्ठव स्पर्धेत वजन गटनिहाय विजेते व उपविजेते असे :
65 किलोसुनील सावंत (कल्याण-रत्नागिरी) व विशाल मोहोळ (पुणे-बारामती), 70 किलो अमित पाटील (कोल्हापूर) व मोहंमद जरीन शेख (अकोला-अमरावती), 75 किलो-प्रवीण छुनके (कोल्हापूर) व नामदेव शिंदे (नाशिक-जळगाव), 80 किलो-राहुल कांबळे (कोल्हापूर) व दिनेश धाडे (नाशिक-जळगाव), 90 किलो अपूर्व शिर्के (कल्याण-रत्नागिरी) व गौरव पोवार (कोल्हापूर) आणि 90 किलोवरील सलमान मुंडे (कोल्हापूर). महावितरणच्या क्रीडा स्पर्धेत मागील दोन वर्ष अजिंक्यपदाचे मानकरी ठरलेल्या पुणे-बारामती संघाने पहिल्याच दिवशी आगेकूच सुरू ठेवली आहे. या संघाने पहिल्या दिवशी 3 सुवर्ण, तर 2 रौप्यपदके जिंकली. मुख्य कार्यालय भांडुप संघाने 2 सुवर्णपदके जिंकली.