जॅकी श्राॅफ पडद्यावर आणि पडद्याबाहेर कायम स्टायलिश दिसला आहे. देखणा, उंचापुरा तर ताे आहेच. पण, त्याचा फॅशन सेन्स युनिक आणि आयकाॅनिक आहे. मधला काही काळ ताे डाेक्यावर बँडाना बांधायचा. अलीकडे ताे गांधी टाेपी आणि गुरखा टाेपी यांचं फ्यूजन केल्यासारख्या इंटरेस्टिंग टाेप्या वापरताे. कुठेही, कितीही गर्दी असाे, जॅकी श्राॅफ त्यात हट के उठून दिसताेच. त्याचा हा फॅशन सेन्स अद्भुत अशासाठीही आहे की जॅकी फारच गरीब घरातून आलेला आहे. ताे भले भुलेश्वरला राहात असेल लहानपणी, पण राहात हाेता तीन बत्तीच्या चाळीतच.
काॅमन संडास असलेल्या मजल्यावरच्या एका खाेलीच्या घरातच. अगदी हीराे रिलीझ हाेऊन आयेशा दत्ताशी लग्न हाेईपर्यंत, लग्नानंतरही काही काळ ताे त्या घरात राहिला आहे. त्याच्यापाशी उंची फॅशन करायला साधनं नव्हती.पण ताे आईने पडद्यासाठी मागवलेल्या कपड्यातून जीन्स शिवून घ्यायचा. खादी भांडारमध्ये जाऊन स्वस्तात स्वस्त, पाच सहा रुपये मीटरचा कपडा आणायचा आणि स्वस्तात स्वस्त टेलर गाठून त्याला खास सूचना द्यायचा. त्यानुसार कपडे, शर्ट, ँट, बेलबाॅटम, जाकिटं, रुमाल वगैरे बनवून घ्यायचा.आपल्याला पाहून गल्लीतले कुत्रे भुंकले पाहिजेत, म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे दिसलाे आणि फॅशन यशस्वी झाली, हा त्याचा फंडा हाेता.