पुरंदर येथील विमानतळाच्या कामाचे लवकरच टेक ऑफ

09 Jan 2025 22:54:03
 

CM 
 
गेली काही वर्षे प्रतीक्षेत असणाऱ्या पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाला गती येणार असून, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्या पुढाकाराने पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत डीपीआर अंतिम करण्यात येणार असून, भूसंपादन प्रक्रिया एमआयडीसीला सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विमानतळाच्या कामाचे लवकरात टेक ऑफ हाेणार आहेच तसेच मार्च 2029 पर्यंत हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.महाराष्ट्रातील सर्व विमानतळांच्या विमानसेवा आणि विकासकामांसदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरीहवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर माेहाेळ यांच्यात मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. विमानतळांच्या विकासकामांना आणखी वेग देण्यासंदर्भात आणि विमानसेवा आणखी सक्षम करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
 
या बैठकीस भारतीय विमानतळ प्राधिकरण, सैन्यदल, महाराष्ट्र विमानतळ महामंडळाचे, सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित हाेते.याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री माेहाेळ म्हणाले, ‘विमान वाहतूक हे सर्वांत वेगाने वाढणारे क्षेत्र असून, या क्षेत्रातील वाढ विचारात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करावा लागणार आहे.पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जमिनी अधिग्रहण प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार असून, विमानतळाचा डीपीआर सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे नियाेजन आहे. शिवाय मार्च 2029 पर्यंत विमानतळ कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुणे आणि परिसराचा विकास झपाट्याने हाेत असून, विमान प्रवाशांची आणि हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे सध्याचे विमानतळ सुसज्ज आणि अत्याधुनिक साेईसुविधांसह सज्ज केलेले आहे. तरीही पुणे शहर आणि परिसराच्या भवितव्याचा विचार करता पुरंदर विमानतळ पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’
Powered By Sangraha 9.0