कल्याण, 22 जानेवारी (आ.प्र.) :
महावितरणच्या कल्याण आणि भांडुप परिमंडलाने वीजचोरीविरोधात धडक कारवाई केली आहे. गेल्या 9 महिन्यांत 9257 जणांविरुद्ध कारवाई करत महावितरणने 46 कोटी 78 लाखांची वीजचोरी उघडकीस आणली. वीजचोरीची देयके न भरणाऱ्या 906 ग्राहकांवर महावितरणतर्फे थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही परिमंडलांत 880 जणांविरुद कारवाई करून 5 कोटी 7 लाखांचा अनधिकृत वीजवापर उघडकीस आणला आहे. कल्याण परिमंडलात 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2024 या नऊ महिन्यांच्या कालावधीत आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्या 2625 जणांवर कारवाई करून 4 कोटी 66 लाखांची वीजचोरी पकडण्यात आली.
मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या 3942 जणांकडे 22 कोटी 40 लाखांची वीजचोरी आढळली. याशिवाय 403 जणांविरुद्ध कारवाई करून 2 कोटी 23 लाखांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले. चोरीच्या विजेचे देयक व दंडाचा भरणा टाळणाऱ्या 818 जणांविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. भांडुप परिमंडलात वीजचोरी करणाऱ्या 417 जणांवर कारवाई करून 1 कोटी 99 लाखांची वीजचोरी पकडण्यात आली. मीटरमध्ये फेरफार अथवा टॅपिंग करून विजेचा चोरटा वापर करणाऱ्या 2273 जणांकडे 17 कोटी 73 लाखांची वीजचोरी आढळली. याशिवाय 477 जणांविरुद्ध कारवाई करून 2 कोटी 84 लाखांचा विजेचा चोरटा वापर उघडकीस आणण्यात महावितरणच्या पथकांना यश आले आहे.