काेंढणपूर-शिवापूर रस्त्यावर गाईंच्या कळपाला पीएमपीची धडक

12 Jan 2025 22:47:30
 
 

PML 
 
हवेली तालुक्यातील काेंढणपूर- शिवापूर रस्त्यावर भरधाव जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने चरण्यासाठी निघालेल्या गाईंच्या कळपाला जाेरदार धडक दिल्याने कळपामधील चार गाईंचा मृत्यू झाला असून, अनेक गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत राजगड पाेलिसांनी पीएमपी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास गाेठ्यातून शेताकडे चरावयास निघालेल्या बारा गाईंच्या कळपास काेंढणपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव पीएमपी (क्र. एमएच 12 आरएन 6069) बसने जाेरदार धडक मारल्याने कळपातील चार गाईंचा जागीच मृ्त्यू झाला, तर इतर गाई गंभीर जखमी झाल्या आहेत.
 
काेंढणपूर येथील अजय मुजुमले यांचा देशी व सेहवाल, गीर गाईंचा गाेठा असून, सर्व गाई राेज सकाळी गाेठ्याशेजारील डाेंगरामध्ये चरण्यासाठी जातात. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे गाई गाेठ्यातून डाेंगराकडे निघाल्या असताना काेंढणपूरकडून येणारी भरधाव पीएमपी बस गाईंच्या कळपामध्ये घुसली. ही धडक एवढी जाेरदार हाेती की कळपामधील दाेन सेहवाल व दाेन गीर गाईंचा जागीच मृत्यू झाला,तर इतर गाई गंभीर जखमी झाल्या.स्थानिक नागरिकांनी बसला थांबवले व पाेलिसांना याबाबत तातडीने माहिती दिली.
गाईंच्या मृत्यूमुळे तसेच अनेक गाई जखमी झाल्याने गाेठ्याचे मालक शेतकरी अजय मुजुमले यांचे माेठे नुकसान झाले.शिवापूर पाेलीस चाैकीचे अधिकारी, महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने भेट देऊन अपघात स्थळाची पाहणी केली असून, पाेलिसांनी पीएमपी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
Powered By Sangraha 9.0