टीमचे व्यवस्थापन आणि टीममधील सदस्यांना सातत्याने प्रेरणा देण्याचे काम हे माेठे आव्हानात्मक असते. कारण टीममधील प्रत्येक सदस्यांचे स्वतःचे काही मत असते, माहिती असते आणि त्याचबराेबर त्यांची काही मूल्ये असतात, ध्येय आणि काैशल्ये देखील असतात. या सगळ्यांची याेग्य प्रकारे सांगड घालून टीम म्हणून काम करून घ्यायचे असते. टीमला प्रेरणा देताना नेतृत्वाने स्पष्ट दृष्टीकाेन मांडला पाहिजे आणि अपेक्षा स्पष्टपणे सांगितल्या पाहिजेत. टीमकडून एकत्रितपणे आणि प्रत्येक सदस्य म्हणून काय अपेक्षा आहेत याची मांडणी केली पाहिजे. लीडरने खुल्या संवादाचे आणि विश्वासाचे वातावरण तयार केले पाहिजे. त्याचबराेबर टीमचे ध्येय आणि व्यावसायिक ध्येय काय आहे हे प्रत्येक सदस्याला समजले आहे याची खात्री करून घेणे ही लीडरचीच जबाबदारी असते.
अपेक्षा स्पष्ट करा ः अनेकदा लीडरला स्वतःबद्दल आत्मविश्वास नसताे. अशा स्थितीत सहकाऱ्यांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत हे ताे स्पष्ट पणे मांडत नाही आणि मग गाेंधळाची स्थिती निर्माण हाेते. टीममधील प्रत्येकाला त्याच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि एकंदरीत टीमकडून काय अपेक्षा आहेत याची माहिती असली पाहिजे. त्यातही काहीजण टीम म्हणून काम करण्यास उत्सुक असतात आणि काहीजण व्यक्ति म्हणून स्वतःच्या पातळीवर काम करणे याेग्य मानतात.