मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक निर्माण केल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडतील. तसेच, ‘हाॅस्पिटल ऑन व्हील’ हे रेल्वेच्या डब्यात उभे केलेलं रुग्णालय ही अभिनव संकल्पना असून, यामुळे सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या आराेग्यासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.भुसावळ रेल्वे विभागाच्या ‘हाॅस्पिटल ऑन व्हील’ आणि भुसावळ रेल्वे ग्राउंडवरील ‘नवीन सिंथेटिक ट्रॅक’चे उद्घाटन करताना राज्यपाल बाेलत हाेते. यावेळी वस्त्राेद्याेग मंत्री संजय सावकारे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापकधर्मवीर मीना, मध्य रेल्वेचे मुख्य संचालन व्यवस्थापक श्यामसुंदर गुप्ता, भुसावळ मंडळ विभागीय व्यवस्थापक ईटी पांडे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
राज्यपालांनी ‘मशाल’ पेटवून ‘ज्याेती’ प्रज्वलित करून सिंथेटिक ट्रॅकचे उद्घाटन केले. ही मशाल रेल्वे शाळेतील बालक्रीडापटूंनी ट्रॅकवर फिरवत नेली. त्यामुळे क्रीडांगणाचा उज्ज्वल भविष्यकाळ प्रतीत झाला. यावेळी धावणे आणि रिले रेस स्पर्धाही घेण्यातआली.
सुनील शंकरम, अनिल कुमार, छबिनाथ फाैजदार या रेल्वे ट्रॅकची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गाैरव करण्यात आला. भुसावळ विभागाने रेल्वेतील ‘की-मेन’वर काढलेले काॅफी टेबल बुक आणि त्यांचा माझ्या हस्ते केलेला सन्मान ही बाब मला आनंद देणारी वाटली. त्यांच्या मेहनतीमुळे अपघात टळतात आणि असंख्य जीव वाचतात. त्यांचा आजचा सन्मान त्यांच्या माैल्यवान याेगदानाची याेग्य पावती असल्याचे गाैरवाेद्गार राज्यपालांनी काढले. आमचं लहानपण ज्या ग्राउंडवर गेले, त्याचे हे पालटलेले रूप पाहून आनंद झाल्याची भावना संजय सावकारे यांनी बाेलून दाखवली.