याे याे हनी सिंगची अनेक गाणी शुद्ध पाचकळ, नाॅन्सेन्स असतात. एकेकाळी हनी सिंगला या गाण्यांनी लाेकप्रियता मिळवून दिली. तेव्हा ताे वयानेही लहान हाेता, त्यामुळे त्याने तेव्हा या गाण्यांविषयी काही वाईट बडबड केली नाही. आता ताे वयानेही वाढला आहे, आयुष्यानेही त्याला दणके बरेच दिले आहेत, त्यामुळे आता ताे स्वत:च सांगताे की माझी गाणी अत्यंत निरर्थक हाेती. पण लाेक त्यांच्यावर नाचत हाेते, कॅसेट कंपन्यांना ती हवी हाेती, याला काय करणार? त्याची पंजाबी गाणी हिट झाली, तेव्हा काॅकटेल या सिनेमासाठी अंग्रेजी बीट हे गाणं बनवलं गेलं. टी सिरीजच्या भूषण कुमारमार्फत ही गाणी बनवून घेतली जायची. नंतर त्याच्याकडे अंग्रेजी बीटसारखंच गाणं बनवून देण्याचा प्रस्ताव आला. ताे म्हणाला, आता पुन्हा ते गाणं बनणार नाही. मी पार्टी ऑल नाइट हे गाणं बनवताे. निर्मात्यांनी नकार दिला. हनीने सांगितलं, गाणं हेच बनेल. भूषण कुमारच्या मध्यस्थीने बाॅस या सिनेमासाठी हे गाणं तयार झालं आणि तेही सुपरहिट झालं. मग त्याच्याकडून तशाच गाण्याची मागणी व्हायला लागली. पण, यारियाँ 2 या सिनेमासाठी त्याने आज ब्लू है पानी असं (त्याच्या मते त्याचं सर्वात बकवास, निरर्थक) गाणं बनवलं. तेही हिट झालं.