वृत्तपत्र लेखकांची चळवळ जोमाने सुरू ठेवावी : भूषण गगराणी

04 Sep 2024 16:02:34
 
 
vr1
 
मुंबई, 2 सप्टेंबर (आ.प्र) :
 
‘महाराष्ट्राच्या इतिहासात सीमालढा असो की स्थानिक चळवळी, त्यात वृत्तपत्र लेखकांनी जनमत घडविण्याचे अनमोल कार्य केले आहे. आज समाज माध्यमे कितीही प्रबळ झाली असली, तरी विश्वासार्हता टिकविण्याचे काम हे वृत्तपत्र लेखकांकडूनच होत आहे. त्यामुळे जनतेचे प्रांजळ विचार मनामनांत पोहोचवणारी वृत्तपत्र लेखकांची चळवळ यापुढे अशीच जोमाने सुरू ठेवावी,' अशी अपेक्षा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली. दैनिक नवशक्ती-फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्रसमूहाने आयोजित केलेल्या मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या ‌‘जनमनाचा कानोसा' संमेलनाच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते.
 
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले, ‌‘आजचा हा समारंभ अत्यंत कौटुंबिक वातावरणात साजरा होत आहे. वृत्तपत्र लेखकांच्या या चळवळीचा पाया नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल; तसेच त्यांच्या मालक-व्यवस्थापनाने घातला. मी आता महापालिका आयुक्त पदावर असलो तरी राज्याच्या माहिती महासंचालनालयातही होतो. त्यामुळे पत्रकारितेचे क्षेत्र मी जवळून अनुभवले आहे. त्या काळात समाज माध्यमांना नुकतीच पालवी फुटू लागली होती. ती पूर्ण क्षमतेने लोकांपर्यंत पोहोचली नव्हती. अशावेळी सर्वसामान्य लोकांसाठी वृत्तपत्रांत पत्रलेखन हेच एक अभिव्यक्तीचे मुख्य साधन होते. त्या काळात बहुतांश वर्तमानपत्रांचे याबाबत उत्तम धोरण होते. चांगल्या लेखकांच्या पत्रांना वर्तमानपत्रांत योग्य स्थान दिले जात होते. सरकार आणि प्रशासनालाही जनमताचा आरसा म्हणून अशा पत्रांचा उपयोग होत असे. सध्या जिल्हा परिषदा असोत की नगरपालिका, महापालिका असोत. तेथे महापौर, लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. आमच्याकडे लोकांकडून येणारा फीडबॅक पूर्णपणे बंद झाला आहे. हा अपवादात्मक प्रसंग आहे. तसे पाहता लोकप्रतिनिधींकडून मिळणारा फीडबॅक हा राजकीयदृष्ट्या प्रेरित असतो; पण वृत्तपत्र लेखकांची पत्रे ही प्रांजळ असतात.'
 
vr
लेखकांची सर्जनशीलता :
गगराणी म्हणाले की, जागतिक स्तरावरचे इकॉनॉमिस्ट हे वर्तमानपत्र गेली दीडशे वर्षे प्रत्येक अंकात एक पान वाचकांच्या पत्रांसाठी देते. त्यात विविध विषयांवर गंभीर चर्चा करणारी वाचकांची पत्रे असतात आणि शेवटी एक पत्र मनोरंजनात्मक असते. त्यातून वृत्तपत्र लेखकांची सर्जनशीलता दिसून येते. नवशक्ती, फ्री प्रेस जर्नल यांनी जोपासलेली ही वृत्तपत्र लेखकांची चळवळ आहे. वाचकांच्या पत्रांमधून लोकांच्या मनात काय चालले आहे, याची नाडीपरीक्षा होते. लोकांचे विचार पोहोचवणारी ही चळवळ अशीच चालू राहो, यासाठी माझ्या शुभेच्छा आणि माझे ते तुम्हाला आवाहन आहे असेही समजा, असे मनोगत भूषण गगराणी यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या संमेलनाचा 75 वा वर्धापनदिन सोहळा नवशक्ती-फ्री प्रेस जर्नलच्या प्रांगणात शनिवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला.
 
नवशक्तीचे कार्यकारी संपादक प्रकाश सावंत यांनी उपस्थितांचे स्वागत केले; तसेच त्यांच्याच हस्ते गगराणी यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संघाचे कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड यांच्या हस्ते पत्रकार हर्डीकर यांना सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. नवशक्ती फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. नवशक्ती फ्री प्रेस जर्नलचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कर्नानी यांना मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक रमेश सांगळे यांना वृत्तपत्र लेखक चळवळीसाठी योगदान दिल्याबद्दल ‌‘जीवनगौरव' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविक केले. संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश नागणे यांनी सूत्रसंचालन केले. संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला राज्यभरातून अनेक ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक आवर्जून उपस्थित होते.
 
संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंद आणि उत्साहाचा आहे. वृत्तपत्र लेखकांवर खरे तर हे नवशक्तीचे उपकार आहेत. त्या काळात आणि आजही नवशक्तीने आमच्यावर आपले उपकार कायम ठेवले आहेत. त्यावेळी तांबे उपाहारगृहात नवशक्तीचे मालक सदानंद यांच्या पुढाकाराने झालेल्या या संमेलनाला दोनशे पत्रलेखक हजर होते, याची आठवण त्यांनी करून दिली. वृत्तपत्र लेखकांच्या या चळवळीचा श्रीगणेशा नवशक्तीमुळेच झाला. पुढे समाजातील विविध मान्यवरांनी संस्थेच्या व्यासपीठावर येत चळवळ जिवंत ठेवली आहे. ज्याची पुढची वाटचाल अशीच अनेक शंभर वर्षे चालणार आहे. असा संकल्पयुक्त आशावाद त्यांनी व्यक्त केला. संघाचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी पहिल्या ‌‘समका' संमेलनाची आठवण जागवताना सांगितले की, त्या दिवशी झालेल्या संमेलनाच्या बातमीचे हेडिंग होते...आइस्क्रीमपेक्षा चर्चा भारी झाली. कारण काय, तर संमेलन मोठ्या झोकात पार पडले होते. त्यावेळी ज. द. शिंदे यांनी स्वखर्चाने सर्व उपस्थितांना आइस्क्रीम दिले होते. यावेळी चितळे उद्योगसमूहाचे (पुणे) व्यवस्थापक राहुल जोगळेकर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
 
हर्डीकर यांचा राजकीय नेत्यांवर तोफगोळा :
ज्येष्ठ पत्रकार विनय हर्डीकर यांनी यावेळी राज्य; तसेच देशातील राजकारणी आणि राजकारणाला आलेले स्वरूप यावर टीकेचा तोफगोळा झाडला. महाराष्ट्रात सध्या राजकीय गँगवॉर सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या सात टोळ्या राज्यात धुमाकूळ घालत आहेत. त्यांनी राजकारणाची अत्यंत खालची पातळी गाठली आहे. लोकांना वेठीस धरले आहे, अशी टीका त्यांनी केली. आता लोकांनीच या नेत्यांना हे थांबवण्यास सांगितले पाहिजे. देशभरातही असेच टोळीयुद्ध सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत टोळीयुद्ध पाहायला मिळाले. राजकारणाचे हे स्वरूप बदलण्यासाठी वृत्तपत्र लेखकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. मोफत लाभाच्या योजना या लोकांना गरीब-दुर्बल ठेवत मतपेढीचे राजकारण साधण्याचा डाव आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
 
संपादक, पत्रकार, स्तंभलेखक; तसेच जागरूक अधिकाऱ्यांना वाचकांच्या पत्रव्यवहारातून पोचपावती व दिशा मिळत असते. मराठी वृत्तपत्र लेखक संघाने हे काम गेली 75 वर्षे केले. आपल्या देशात लोकशाहीला पर्याय नाही. लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे काम वृत्तपत्र लेखकांना करावे लागेल. या समारंभात ज्येष्ठ पत्रलेखक विजय ना. कदम, मधुकर कुबल, सुनील शिंदे, परशुराम पाटील, सुनील कुवरे, कृष्णा ब्रीद, भाऊ सावंत आदींचा अमृतपर्व सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. त्याचबरोबर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे, मनोहर साळवी, प्रकाश नागणे, प्रशांत घाडीगावकर, दत्ताराम घुगे, नंदकुमार रोपळेकर, चंद्रकांत पाटणकर, राजन देसाई, आत्माराम गायकवाड, अरुण खटावकर, श्रीनिवास डोंगरे, नवनाथ दांडेकर, अनंत मोरे, दिगंबर चव्हाण आदींना सन्मानपत्र देण्यात आले.
Powered By Sangraha 9.0