दैनंदिन जीवनातील एकसुरीपणातून लांब जाण्यासाठी पर्यटन केले जाते. आपले गावशहर-राज्य साेडून बाहेर पडल्यामुळे वेगळ्या संस्कृतींबराेबर परिचय हाेताे आणि अनुभवांनी आयुष्य समृद्ध हाेते. आपल्या आवडीनुसार लाेक पर्यटन करतात. काेणी गिरिस्थानांवर जातात, काेणी सागर किनारे पसंत करतात, तर काेणी ऐतिहासिक स्थळे पाहून माहिती मिळवितात. सध्या देशात आध्यात्मिक अथवा धार्मिक पर्यटनाला पसंती वाढत असल्याचे दिसते. भारतासारख्या वैविध्याने नटलेल्या देशात अशा स्थळांची कमतरता नाही. भगवान गाैतम बुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थळांना भेटी देणारे वाढत असल्याने बिहारमध्ये पर्यटनाला चांगले दिवस आले आहेत.महाराष्ट्रात जैन धर्मीयांची काही पवित्र स्थळे असल्याने तेथेही लाेक येत असतात. यातील काही स्थळे तर अनेक शतके प्राचीन आहेत.
‘युनेस्काे’च्या जागतिक वारशात समाविष्ट झालेले अमृतसरचे विख्यात सुवर्ण मंदिर हे शिखांचे सर्वांत पवित्र स्थळ आहे. तेथे प्रार्थना करण्यासाठी लाेक येतात. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक स्थळांना भेट देणाऱ्यांची संख्याही वाढत चालल्याचे दिसते. आपल्या देशाच्या इतिहासाबराेबरच संस्कृती समजून घेण्याची इच्छा आता वाढत असल्याने पर्यटकही वाढलेले दिसतात.उत्तर प्रदेशातील सहा बाैद्घ स्थळांसाठी 205 प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून, त्यासाठी 590.40 अब्ज रुपयांचा खर्च येणार आहे. त्यात सारनाथ (549.92 अब्ज रुपये), काैशम्बी (33.09 अब्ज रुपये) या दाेन प्रकल्पांसाठी सर्वाधिक खर्च हाेईल. या सहा बाैद्ध स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने विमानतळ, रेल्वे स्थानके आणि पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू केली आहेत. पर्यटनाला प्राेत्साहन मिळण्यासाठी या क्षेत्रांत जास्त गुंतवणुकीचीही अपेक्षा आहे.
आतिथ्य क्षेत्रातील रॅडिसन ब्ल्यू, पार्क इन, मॅरिएट आणि सराेवर पाेर्टिकाे आदींसह 30 दिग्गज कंपन्या त्यासाठी उत्सुक आहेत.
वाराणसी, लखनाै आणि अयाेध्या येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच गाेरखपूर, कुशीनगर, प्रयागराज व आग्रा येथे देशांतर्गत वाहतुकीचे विमानतळ बांधले जाणार आहेत. या शहरांतील रेल्वे स्थानकांचेही आधुनिकीकरण सुरू असल्यामुळे आगामी काळात पर्यटकांची संख्या वाढून येथील चित्र बदलणार आहे. ‘केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या संयुक्त प्रयत्नांमुळे फक्त बाैद्ध यात्रेकरूंनाच फायदा हाेणार नसून, स्थानिकांनाही राेजगाराच्या नव्या संधी उपलब्ध हाेणार आहेत. उत्तर प्रदेशातील बाैद्ध संग्रहालयांतील सुविधाही वाढविल्या जात असल्याने इतिहास समजण्यासाठी मदत हाेईल,’ असे राज्याच्या पर्यटन मंत्रालयाच्या सचिव व्ही.विद्यावती यांनी या परिषदेतील भाषणात नमूद केले.
‘बुद्ध सर्किट’बराेबरच उत्तर प्रदेशातील बारा माेठ्या पर्यटन क्षेत्रांचाही विकास केला जाणार असून, त्यात ‘सुफी कबीर सर्किट’ आणि ‘जैन सर्किट’चा समावेश आहे. ‘सुफी कबीर सर्किट’चा विस्तार अमेठी, मगहर, संत कबीरनगर आणि संत कबीर यांची कर्मभूमी असलेल्या लहरतारापर्यंत (वाराणसीजवळ) करण्याचा प्रस्ताव आहे. ‘जैन सर्किट’चा विस्तार देवगड आणि हस्तिनापूरपासून पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आणि रामनगरपर्यंत करण्याचा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्रातही काम सुरू : ‘हाेली जैन तीर्थ सर्किट’ या याेजनेद्वारे महाराष्ट्रानेही प्रयत्न सुरू केले असून, राज्यातील महत्त्वाची जैन धार्मिक स्थळे जाेडण्याचे काम सुरू केले आहे.
मध्य प्रदेशाचे प्रयत्न : मध्य प्रदेश सरकारही ‘बुद्धिस्ट सर्किट’ विकसित करत असून, राज्यातील सांची हे स्थळ बिहारमधील बाेधगयेबराेबर जाेडले जाणार आहे. बाैद्ध यात्रा मार्गाबाबत (बुद्धिस्ट पिलग्रिमेज रूट) माहिती देताना पर्यटन आणिसंस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले, की राज्य सरकारने पुरेसे प्रयत्न केले, तर भारतात दरवर्षी 2.3 दशलक्ष पर्यटक येऊ शकतात.
वाढते पर्यटन : प्रवासी संस्थांच्या म्हणण्यानुसार, सरकारचे प्रयत्न, पायाभूत सुविधांचा विकास आणि प्रवासाच्या सुलभतेमुळे गेल्या काही वर्षांत देशातील धार्मिक-आध्यात्मिक पर्यटनात वाढ झाली आहे.‘चार धाम यात्रा, ज्याेतिर्लिंग यात्रा, वाराणसी, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, द्वारका, साेमनाथ, मल्लिकार्जुन, रामेश्वरम आदी धार्मिक स्थळांचे प्रवासी वाढले आहेत,’ असे थाॅमस कुक (इंडिया) च्या हाॅलिडेज विभागाचे प्रमुख राजीव काळे यांनी सांगितले. अयाेध्येतील श्रीराम मंदिरामुळे धार्मिक पर्यटनाला अधिक प्राेत्साहन मिळाल्याचे दिसते, अशी माहिती ‘एसओटीसी ट्रॅव्हल’चे अध्यक्ष डॅनियल डिसुझा यांनी दिली.