माफी मागणे केव्हाही चांगले ठरते

22 Sep 2024 19:14:30
 

Sorry 
 
चुका हाेणे ही मनुष्यजीवनातील एक सामान्य गाेष्ट आहे. कधीच काेणत्याही प्रकारची चूक न केलेली व्यक्ती सापडणे कठीणच. आपण चूक केलेल्या की चुकीचे पडसाद भाेगणाऱ्या बाजूला उभे आहाेत- यावर बऱ्याच गाेष्टी अवलंबून असतात.चुकीबराेबर माफी ही जाेडलेली दिसत असली तरी तिचा अवलंब आपण काेणत्या बाजूस उभे आहाेत यावर ठरताे. माफी मागणे वा न मागणे यामागची मानसिकता वेगळीच असते.आपण माफी मागितल्यास घटनेची जबाबदारी आपल्यावरच येते व समाेरची व्यक्ती मुक्त हाेते, या भावनेतून ते माफी मागणे टाळतात.वेळप्रसंगी राग, चिडचीड, कुरबूर, भावनिक दुरावा त्यांना चालताे. पण माफी मागितल्याने सामाेरे जावे लागणाऱ्या आपल्यातल्या कमतरता, दुर्बलता व चुकांचा सामना करणे त्यांना कठीण वाटते.
 
प्रत्येक व्यक्तीकडून चुका हाेतात पण यशस्वी व्यक्ती ताेच असताे जाे आपल्या चुका मान्य करताे आणि माफी मागताे.पण जीवनाचा हा सर्वात यशस्वी फाॅर्म्युला अनेकदा लाेकांना कठीण वाटताे. आपल्या चुकांची माफी कशी मागायची हे फार कमी लाेकांना माहीत असते. खरं तर जाेपर्यंत तुम्ही चूक करत नाही ताेपर्यंत तुम्हाला या गाेष्टी लक्षात येणार नाहीत.आपण सर्व आपल्या दैनंदिन जीवनात कितीतरी चुका करताे आणि त्याच चुका वारंवार करताे. खरे तर आपण चूक सुधारणे गरजेचे असते. त्यासाठी आपल्याला आपली चूक समजून घेवून मनापासून स्वीकार करून माफी मागण्याचे मूल्य समजून घेणे महत्त्वाचे असते. कुठल्याही नात्यात माफी मागण्याचे वेगळे महत्त्व आहे. असे केल्याने आपण आपल्या लाेकांना त्यांचे महत्व आणि आपण केलेली चूक यावर पश्चाताप झाल्याची जाणीव करुन देत असताे.
Powered By Sangraha 9.0