वाह लक्ष्मणजी वाह!

    01-Sep-2024
Total Views |
 

thoughts 
 
आरके लक्ष्मण हे जीनियस व्यंग्यचित्रकार हाेते. त्यांची अनेक व्यंग्यचित्रं आजही प्रसृत हाेतात आणि लाेकप्रिय हाेतात.म्हणजे लक्ष्मण कालातीत हाेते की, आपल्या देशात काहीच बदललेलं नाही, आपण जिथे हाेताे तिथेच आहाेत किंवा मागे मागेचचाललाे आहाेत.उदाहरणार्थ, समाजावर वाईट परिणाम करणाऱ्या कलाकृतींवर बंदी घालावी, अशी मागणी देशात काेणीही चिरकुट उठून करतात आणि त्या आधारावर कलावंतांची, विचारस्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली जाते.एम. एफ. हुसेनसारख्या चित्रकाराला तर देश साेडून जावं लागलं अशा तथाकथित संस्कृतिरक्षकांमुळे.
 
कलाकृतींचा समाजावर परिणाम हाेत असता, तर संत ज्ञानेश्वर बघून लाेक संत बनले असते आणि लगे रहाे मुन्नाभाई पाहून गांधीवादीही बनले असते ना! तसं का हाेत नाही? काेणतीही कलाकृती हवेत बनत नाही. ती समाजातच बनते. समाजाचाच आरसा असते. समाजात काय चाललं आहे, तेच दाखवते. त्याच्यात चेहरा कुरूप दिसत असेल, तर आरसा फाेडून उपयाेग काय, तुमचा चेहरा कुरूप आहेच, ताे लाेकांना तसाच दिसणार आहे.लक्ष्मण यांनी इथे बंदीची कल्पना समाजावर आणि सत्तेवर उलटवली आहे.
इथे सिनेमावाल्यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलंय नेत्याला आणि ते मागणी करतायत की समाजातली खुनाखुनी, बलात्कार, अत्याचार यांच्यावर बंदी घाला, त्यांचा आमच्या सिनेमांवर वाईट परिणाम हाेताेय!