विकास खन्ना हा मिशेलिन स्टार मिळवणारा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा भारतीय शेफ. ताे फारच निम्न मध्यमवर्गीय वातावरणातून इतक्या वर पाेहाेचला. तरी त्याने एक थेट देसी, पंजाबी माणसाचा आत्मा हरवू दिलेला नाही. एका मुलाखतीत त्याला त्याच्या आवडीचा पदार्थ विचारला गेला, तेव्हा त्याने सांगितलं की मला आईच्या हातचा आलू मेथीचा पराठा खूप आवडताे. आता हा काही ताज्या भाजीचा पराठा बनत नाही. आपल्याकडे रात्रीचा शिळा भात फाेडणीला घातला जाताे, शिळ्या चपातीचा चिवडा किंवा कुस्करा किंवा फाेडणीची पाेळी बनते; तसा हा प्रकार.आदल्या रात्रीची आलू मेथीची भाजी शिल्लक असेल, तर पराठ्याचा आटा लावून त्यात आलू मेथीची भाजी मॅश करून भरून पराठा बनवला जाताे.
त्याच्याबराेबर आंब्याचं लाेणचं मिळालं की विकास खूष हाेताे. त्याने आपल्या रेस्तराँमध्येही हेच देशीपण जपलेलं आहे. ताे म्हणताे, ‘मला सगळ्यात माेठी काॅम्प्लिमेंट कॅनडाच्या एका 80 वर्षांच्या बाईने दिली हाेती. माझ्या रेस्टाॅरंटमध्ये तिने जेवण केलं’ आणि मला म्हणाली, ‘माझी आज्जी सेम असं जेवण बनवायची.तिच्या हातातला रस तुझ्या हातात आहे.’ विकास म्हणताे, तिने रस हा शब्द वापरला, तिची आजी किती मागच्या काळातली असेल, तिच्यासारखं जेवण बनवता येत असेल, तर मी भरून पावलाे.