पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंद मागे घेतला

    03-Jul-2024
Total Views |
 
 
pune
पुणे, 2 जुलै (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
जिल्ह्यातील दगडखाण आणि क्रशर व्यावसायिकांच्या काही मागण्या मान्य झाल्या असून, उर्वरित मागण्या पूर्ण करण्यासाठी धोरण तयार करण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाल्यामुळे पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने पुकारलेला बेमुदत बंद रविवारी मागे घेण्यात आला. असोसिएशनने 21 जूनपासून बंद पुकारल्यानंतर खासगी बांधकामांसोबतच शासकीय बांधकामांवरही परिणाम झाला होता. जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेल्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांच्या उपद्रवामुळे पुणे जिल्हा खाण व क्रशर असोसिएशनने 21 जूनपासून जिल्ह्यात बंद पुकारला होता.
 
शासन स्तरावर व्यावसायिकांनी केलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन मागील आठवड्यात भरारी पथक बंद करण्याचे आदेश दिले होते. यानंतर असोसिएशनचे कार्याध्यक्ष प्रदीप कंद, राम दाभाडे, उपाध्यक्ष रामदास काकडे, सचिव योगेश ससाणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दौंडचे आमदार राहुल कुल आणि जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत चर्चा केली.
 
शासनाकडून व्यावसायिकांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या; तसेच उर्वरित मागण्यांसाठी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर असोसिएशनच्या सदस्यांची काल वाघोली येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये संप मागे घेण्यात असल्याची घोषणा करण्यात आली; तसेच असोसिएशनने 1 सप्टेंबर 2019 ला तयार केलेल्या दरपत्रकानुसार मालाची विक्री करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले, अशी माहिती असोसिएशनचे सचिव आणि माजी नगरसेवक योगेश ससाणे यांनी दिली.