सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यावर भर देणार

27 Jul 2024 14:06:28
 
 
say
मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) :
 
सध्या समाजात डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाइन व्यवहारांच्या माहितीअभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा स्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक सक्षम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‌‘व्हॉट नाऊ' ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम; तसेच व्हॉट नाऊ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाइनचे उद्घाटन मुख्य सचिवांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
 
मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, व्हॉट नाऊच्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते. सायबर गुन्हे व ऑनलाइन छळवणुकीच्या प्रकारांमुळे युवकांवर परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव म्हणाल्या, की राज्यात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंधासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापेत सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. व्हॉट नाऊ संस्थेने हेल्पलाइन जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे.
Powered By Sangraha 9.0