‌‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत' योजनेला मोठा प्रतिसाद

एसटीच्या मोहिमेत जूनमध्ये 4 लाख 3 हजार 294 विद्यार्थ्यांनी घेतले पास

    27-Jul-2024
Total Views |

 
 
st
मुंबई, 26 जुलै (आ.प्र.) :
 
शाळा-महाविद्यालयांत शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्या शाळेत वितरित करण्याची योजना 18 जूनपासून सुरू करण्यात आली. केवळ 12 दिवसांत 4 लाख 3 हजार 294 विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी पास वितरित केले आहेत. ही संख्या गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत 83 हजारांनी जास्त आहेत; तसेच उत्पन्न 26 कोटींनी वाढले आहे. विद्यार्थ्यांनी या योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे. एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी यंदापासून विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्याची योजना सुरू केली. तसे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले.
 
त्यानुसार प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा-महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण करू लागले आहेत. या योजनेला 12 दिवसांत उदंड प्रतिसाद मिळाला असून, जुलैतही अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करत आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66 टक्के सवलत दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहून पास घ्यावे लागत होते.
 
तथापि, यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. यासाठी 18 जूनपासून एसटी प्रशासनातर्फे एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनींना होत आहे.