पालखीसोहळ्यात वारकऱ्यांना आवश्यक सुविधा द्याव्यात

18 Jun 2024 14:00:24
 
 
ajit
पुणे, 17 जून (आ.प्र.) :
 
आषाढी पालखीसोहळ्यादरम्यान पंढरपूर, पालखीमार्ग, पालखीतळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखीसोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत पवार बोलत होते.
 
आमदार सर्वश्री दिलीप मोहिते पाटील, संजय जगताप, दत्तात्रय भरणे, समाधान अवताडे, बबन शिंदे, संजय शिंदे, सुनील कांबळे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, पुणे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह- अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते. पालखीसोहळ्यासाठी फिरती शौचालये आणि टँकरची पुरेशी व्यवस्था करण्यात यावी. शौचालयांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. इंद्रायणी नदी स्वच्छतेचे काम तातडीने करावे. पालखीसोहळा झाल्यानंतर पंढरपूर शहरात स्वच्छतेसाठी आवश्यक नियोजन करावे. मानाच्या पालख्यांसह इतर पालख्यांसाठी रात्री विद्युतव्यवस्था करावी.
 
पालखीमार्गाला लागून असलेल्या जागा सोहळ्याच्या दृष्टीने कायमस्वरूपी ताब्यात घेऊन त्याचा पालखीसोहळा वगळता इतरवेळी अन्य उपयोग करण्याबाबत प्रस्ताव तयार करावा. अशा जागांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखीमार्गावरील कायमस्वरूपी सुविधेच्या दृष्टीने विभागीय आयुक्तांकडे बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या पालखीसोहळ्यासाठी सुरक्षा आणि अन्य व्यवस्था देण्याबाबत राज्य स्तरावरून सूचना देण्यात येतील. वारीदरम्यान सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येईल. मात्र, दुर्घटना घडल्यास राज्य शासन आर्थिक सहकार्य करेल, असेही पवार यांनी सांगितले. विभागीय आयुक्तांनी नियोजनाची माहिती दिली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुरक्षा आणि वाहतूक नियोजनाबाबत माहिती दिली.
Powered By Sangraha 9.0