एखाद्याचे नुकसान करणे अधर्म आहे

12 May 2024 23:38:46
 
 
 

thoughts 
राग एक वाईट गाेष्ट आहे. यापासून दूर राहावे. जेव्हाही मनामध्ये राग उत्पन्न झाल्यानंतर थाेडावेळ शांत बसावे. अधिक उत्साहात केलेले कामही बिघडण्याची शक्यता राहते. वासनेवर नियंत्रण नाही ठेवले, तर याचे गंभीर परिणाम भाेगावे लागू शकतात.एखाद्यावर जास्त प्रेम करण्यातही घाई करू नये.राग भाव उत्पन्न झाल्यानंतर काही काळ थांबल्यास विचार शांत हाेतात आणि आपण वाईटापासून दूर राहताे. दर्प म्हणजे गर्व, ही गाेष्ट व्यक्तीला उद्ध्वस्त करू शकते. या गर्वामुळेच रावण आणि दुर्याेधनाचा अंत झाला. गर्व मनामध्ये उत्पन्न हाेताच याचे एकदम प्रदर्शन करू नये. काही काळ शांत बसावे. असे केल्याने तुमच्यामधील गर्वाची भावना नष्ट हाेऊ शकते आणि तुम्ही या गाेष्टीपासून दूर राहू शकता.जर ताकदवान व्यक्ती एखाद्या कमजाेर व्यक्तीसाेबत वाद करत असाल, तर थाेडेफार नुकसान ताकदवान व्यक्तीचेही हाेतेच. वाद करण्यापूर्वी आपण काेणत्या गाेष्टीसाठी भांडत आहाेत याचा शांत डाेक्याने विचार करावा.
 
नात्यांमध्ये वाद-विवाद हाेताच राहतात; परंतु परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे जाणवल्यास काही काळ शांत बसावे.यामुळे वादही संपुष्टात येऊ शकताे. जर मनामध्ये एखादे चुकीचे काम म्हणजचे पाप करण्याचा विचार येत असेल, तर ही चिंतेची बाब आहे. चुकीचे काम म्हणजे चाेरी करणे, स्त्रियांचा अपमान करणे, धर्माविरुद्ध काम करणे इ. हे काम करण्यापूर्वी थाेडावेळ थांबल्यास मनामध्ये चुकीचे काम करण्याचा विचार नष्ट हाेऊ शकताे. पाप कर्मामुळे व्यक्तीचे सुख आणि पुण्य नष्ट हाेते. जर तुम्ही एखाद्याचे नुकसान करण्याची याेजना आखत असाल, तर या याेजनेवर काम करण्यापूर्वी थाेडावेळ थांबावे. या कामामध्ये जेवढा उशीर कराल तेवढेच चांगले राहील. एखाद्याचे नुकसान करणे अधर्म आहे. असे म्हणतात की, जे लाेक दुसऱ्यांसाठी खड्डा खाेदतात, तेच त्या खड्ड्यामध्ये पडतात. यामुळे दुसऱ्यांचे अहित करण्यापूर्वी थाेडावेळ अवश्य थांबावे.
Powered By Sangraha 9.0