मूकबधिर 318 मुलांना श्रवणयंत्र माेल्ड वाटप

    24-Apr-2024
Total Views |
 
 
 

School 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्याेदय फाऊंडेशन व महाट्रान्सकाेच्या विद्यमाने स. प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात 318 मूकबधिर मुलांना श्रवणयंत्र माेल्डचे वाटप करण्यात आले. सूर्याेदय फाऊंडेशनच्या माध्यमातून प्रख्यात गायिका अनुराधा पाैडवाल याविषयी जनजागृती करत आहेत.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गाेडसे, मंगेश सूर्यवंशी, राजेंद्र पायमाेडे, विजय चव्हाण, तुषार रायकर, विलास रासकर, सुभाष सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित हाेते. दगडूशेठ गणपती ट्रस्ट व सूर्याेदय फाऊंडेशनच्या वद्यमाने या उपक्रमाला प्रारंभ झाला.
 
गेल्या आठ महिन्यांपासून अनेक रुग्णांना यंत्राचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरांत या उपक्रमाला माेठा प्रतिसाद मिळत आहे.यावरुनच समाजातील माेठी व्यथा समाेर येत असल्याचे दिसून आले आहे, असे रासने यांनी सांगितले. मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृतीसाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे.मुलांना ऐकायला येत नसेल, तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बाेलायलाही शिकत नाहीत.याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे.