उत्पन्नवाढीसाठी नवी मुंबई महापालिकेत टास्क फोर्सची स्थापना

03 Dec 2024 14:23:47
 
new
 
नवी मुंबई, 2 डिसेंबर (आ.प्र.) :
 
महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विशेष कार्यबळाची (टास्क फोर्स) स्थापना केली असून, ही पाच सदस्यीय समिती महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी उपाय सूचवणार आहे. त्यात थकबाकी वसुलीसाठी व विद्यमान वसुलीसाठी नियोजन करून सोबतच उत्पन्नवाढीचे नवीन स्रोत सूचित करणार आहे. याबाबतचा अहवाल 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्क फोर्स कार्यरत राहील.
 
मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मालमत्ताकर विभागाचे उपायुक्त शरद पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे व सहायक संचालक सोमनाथ केकाण असे चार सदस्य महापालिकेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नियोजन करणार आहेत. उत्पन्नवाढीसाठी उपाय सूचवताना टास्क फोर्सने विद्यमान कार्यपद्धतीत कोणते बदल करावे लागतील, याच्या सूचना कराव्यात. असे बदल केल्यानंतर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीने व किती दिवसांत करता येईल आणि कधीपासून उत्पन्नवाढ होईल, हे प्रस्तावात नमूद करावे, असे सूचित करण्यात आले आहे.
 
थकबाकी, चालू वसुली व नवीन स्रोतांमधून अपेक्षित वाढीचे नियोजन सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत; तसेच आवाजवी खर्चाबाबत माहिती सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. शासन निधी प्राप्त करून घेण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि अशी कामे शासन निधीतून करून महापालिकेचा निधी इतर सुविधा कामांसाठी वापरण्याबाबतही सूचना कराव्यात, असे सूचित करण्यात आले. दुबार योजनांचा शोध घेऊन त्या योजना बंद करण्याबाबत अभिप्राय द्यावेत. इतर महापालिकांत राबवण्यात येणाऱ्या उत्पन्नवाढीच्या चांगल्या कार्यपद्धती अभ्यासून त्यांचे अनुकरण करण्याबाबत सूचना कराव्यात, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0