चित्रपटाच्या किंवा मालिकांच्या जगातील ही नाती इंटरनेटच्या जगासारखीच आभासी असूनही अनेक जण त्यात आपला आनंद शाेधतात किंवा ती तेवढ्या काळापुरती बरी वाटतात. पुन्हा जगण्यात पाेकळी तयार हाेते. मग परत त्यावर मार्ग काढण्यासाठी काही नवे उपाय शाेधले जातात. त्या वेळी घाई केली किंवा शाॅर्टकट शाेधले की पुन्हा त्यातून नवे ताण निर्माण हाेतात. या साऱ्यातून मार्ग काढायचा असेल तर कुटुंब भक्कम आणि त्याची ऊब प्रत्येकाला असायला हवी. हे कुटुंब कसं उभारायचं आणि टिकवायचं, हे ज्याचं त्यानं आपल्या शक्तीप्रमाणे करायचं आणि पेलायचं. मात्र हे करताना त्याचा ताणही येऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्यांनाही ताण द्यायचा नाही.
कुटुंबासाठी सारे काही...
कुटुंब हवंच आणि सारं काही कुटुंबासाठी हे सूत्र मानलं, की जगण्यातील अनेक पेच आपाेआप सुटत जातात. ज्याची कुटुंबाची भावनिक बांधिलकी जास्त, त्याच्या समस्या तितक्या कमी, हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झालं आहे.ज्या कुटुंबाची संस्काराची वीण सैल झाली आहे किंवा जीवनमूल्याची गल्लत झाली आहे, तिथं कुटुंब ही लाेढणं ठरली आहेत, पण चुकीच्या बाबी या नियम नसतात. आदर्श उदाहरणं किंवा चांगल्या बाबी याच काळाच्या कसाेटीवर टिकतात आणि पुढे जाऊन त्या जीवनशैलीचा भाग हाेतात.जिवंतपणी मायेचा ओलावा कायम ठेवा! आज समाजात एकाच वेळी घटस्फाेटाचं प्रमाण वाढतंय आणि त्याच वेळी लीव्ह इन रिलेशनशिपची लाईफस्टाईलही वेगानं वाढत आहे. घरातील वृद्ध मंडळींना आश्रमात टाकणारी मुलं आहेत, तसेच वृद्धाश्रमाला लाखाे रुपयांची देणगी देणारे आणि आपल्या जवळच्या नात्यापलीकडच्या अन्य नातेवाइकांना सांभाळणारी तरुण मंडळीही खूप आहेत.
मुलीचा जन्म नाकारणारे आहेत, तसेच आवर्जून मुलगी दत्तकघेणारेही आहेत. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून गुंतागुंतीची समीकरणं तयार हाेत आहेत; पण हेच तर आजच्या जगाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याची गंमत आहे. कुटुंब ही ताकद हाेऊ शकते हे जितकं सत्य, तितकंच त्यासाठी बांधिलकी आणि जबाबदारी घेणंही महत्वाचं आहे.हे ज्याला कळलं त्याला बऱ्याच गाेष्टी उमगतात आणि आयुष्याची वाटचाल खूप आनंदी आणि सफल हाेते.आई-वडील आणि त्याचं प्रेम ते असताना कळत नाही; पण मग ते गेल्यावर त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या नावानं कितीही देणग्या दिल्या तरी त्या प्रेमाची ऊब मिळू शकत नाही. त्या प्रेमाची असाेशी तशीच कायम राहते आणि मग माणूस नवीन आधार शाेधताे. हे टाळायचं असेल तर ही मंडळी हयात असतानाच त्यांच्याशी संवाद आणि प्रेमाचा ओलावा एकमेकांमध्ये पाझरला तर अतृप्तीची भावना मनात राहत नाही.
नात्यांसाठी तडजाेड मान्य करा...कुटुंब खूप महत्त्वाचं वाटतं आणि नाती टिकवायला हवीत असचं वाटतं. काही वेळा पटकन बाेलून किंवा एखाद्या चुकीच्या घटनेनं समाेरचा माणूस दुखावला जाताे, आपल्यापासून दुरावला जाताे.तसं हाेता कामा नये.कुटुंबात प्रत्येक स्त्रीचं स्थान महत्त्वाचं आहे. स्त्री घरं उभारू शकते, घरातल्या सगळ्यांना जाेडून ठेवू शकते तसंच घर ताेडूही शकते. त्यामुळं घरातल्या नात्यांची जबाबदारी घरातल्या स्त्रीवर माेठ्या प्रमाणात असते.त्याचबराेबर घरातल्या मंडळींनीही काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत.घरात सुनेच्या रूपानं येणाऱ्या मुलीसाठी काही तडजाेडी केल्या पहिजेत. ती मुलगी आपलं घर साेडून येत असते, तिला नव्या घरात रुळण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण केलं पाहिजे. म्हणजे मग ती मुलगीही अशा घरात पटकन सामावू शकेल. नात्याकडं पाहताना अत्यंत संवेदनशीलनेनं पाहणं गरजेचं आहे.
स्त्री-पुरुष समानता आजच्या कुटुंबात माहिलांचं स्थान दुय्यम राहिलेलं नाही.आता काळ बदलला आहे. घरातील पुरुष मंडळी, महिलांना कामात मदत करत असतात. घर सांभाळण्याची जबाबदारी केवळ स्त्रीची नसून तिला घरातल्या सगळ्याची साथ मिळायला हवी. आता तशी साथ मिळते. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे घरातील सर्वांनी एकमेकांना मान दिला पाहिजे, दुसऱ्याच्या मतांचा आदर राखला पाहिजे.आपण कुटुंब आणि महिला यांच्यासंबंधी बाेलताेय.महिलादिनाचा विषय अपरिहार्य आहे. मला हा दिवस आणि असा उपक्रम साजरा करणं आवडतं. म्हणजे महिलांना महत्त्व देणं मला आवडतं. महिलांनी आपल्या स्त्रीत्वाचा अभिमानच बाळगायला हवा.