पुणे, 22 डिसेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्रितच लढविल्या आहेत. महाविकास आघाडी अद्यापही आहे; परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक असल्याने महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. भाजप-शिवसेना युती असतानाही बीएमसी आणि इतर काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रच लढल्या जायच्या. त्याचपद्धतीने आगामी निवडणुका लढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे लढण्याचे संकेत दिले. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी खासदार संजय राऊत पुण्यात आले होते.
पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठकही झाली. या बैठकीनंतर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राऊत म्हणाले, ‘महाविकास आघाडी अजूनही आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वबळावर व्हाव्यात, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत उमेदवारांची संख्या जास्त असल्याने महापालिका निवडणूक एकट्याने लढवण्याची पक्षकार्यकर्त्यांची मागणी आहे. उद्धव ठाकरे आणि पक्षाच्या इतर नेत्यांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू आहे. अविभाजित शिवसेना भाजपसोबत युती असतानाही बीएमसी आणि इतर स्थानिक निवडणुकांमध्ये ते एकटेच लढायचे आणि आताही त्याचपद्धतीने निवडणुका लढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
' दरम्यान, पुढील महिन्यात 27 ते 29 जानेवारीदरम्यान बालगंधर्व रंगमंदिर येथे व्यंगचित्रकार अमित पापळ यांच्या ‘बाळकडू-3' या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या पोस्टरचे प्रकाशन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील राजकीय गद्दारी, सामाजिक व राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी व्यंगचित्रे या प्रदर्शनात असतील. या प्रसंगी शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, प्रदेश संघटक वसंत मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राममंदिर आंदोलनात उद्धव-शिवसेना, काँग्रेसचेही योगदान :
राऊत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत म्हणाले, की राममंदिर ही देशाच्या इतिहासातील एक चळवळ आहे. या चळवळीमध्ये केवळ भाजप आणि पंतप्रधान मोदींनीच योगदान दिले नाही, तर आरएसएस, शिवसेना, विहिंपसह काँग्रेस व अन्य पक्षांनीही हातभार लावला. केवळ मंदिर बांधून कोणीही नेता होऊ शकत नाही, हे खरे आहे. हा देश एक मंदिर आहे. त्यांनी अशा लोकांना सत्तेत आणले आणि आता त्यांनीच त्याची जबाबदारी घ्यावी, असा सल्लाही राऊत यांनी भागवत यांना दिला.