इटलीच्या सिनेमाने दिली भारताला प्रेरणा

17 Dec 2024 19:31:37
 
 

Italy 
 
इटली हा युराेपातला देश असूनही काैटुंबिक मूल्यं या एका विषयाच्या बाबतीत भारतासारखाच आहे. आपल्याप्रमाणेच तिथेही एकत्र कुटुंबपद्धतीवर विश्वास आहे आणि तिथे कुटुंब सर्वाेपरी मानलं जातं. भारतातलं खानपान जसं जगभर प्रसिद्ध आहे, तसाच इटलीतला पास्ता-पिझ्झाही जगभर प्रसिद्ध आहे. इटलीमधून सिनेमाच्या क्षेत्रात एक क्रांती घडली, जिचा परिणाम जगभर झाला, भारतीय सिनेमावरही झाला. विट्टाेरियाे डी सिका या दिग्दर्शकाच्या बायसिकल थीव्हज् या सिनेमाने निओरिअ‍ॅलिझम या सिनेशाखेचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. सिनेमा वास्तववादीही असू शकताे आणि ताे स्टुडिओतल्या बंदिस्त सेटच्या बाहेर, सर्वसामान्य जगातही चित्रित करता येताे, या दाेन्ही गाेष्टी या सिनेमाने भारतीय निर्मातेदग्दर्शकांना शिकवल्या.
 
पारशी थिएटरच्या प्रभावातून थाेडा नाटकी असलेला भारतीय सिनेमा यानंतर काहीसा जमिनीवर आला. बाप आणि मुलाची अतिशय हृद्य गाेष्ट सांगणाऱ्या या सिनेमाने बिमल राॅय यांना दाे बीघा जमीन बनवण्याची प्रेरणा दिली. राज कपूरने या सिनेमाकडून प्रेरणा घेऊन जागते रहाे आणि बूटपाॅलिश या सिनेमांची निर्मिती केली. सत्यजित राय यांना तर चाळिशीनंतरच्या वयात हा सिनेमा पाहिल्यावर साक्षात्कार झाला की, आपल्यालाही आयुष्यात असाच सिनेमा काढायचा आहे. त्यांनी पाथेर पांचालीची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आणि भारतीय सिनेमाचा झेंडा जगभर फडकवला.
 
 
Powered By Sangraha 9.0