शाळेतील कामगिरी सुधारण्यासाठी मुलांना स्मार्ट बनवा

01 Dec 2024 19:10:15
 
 

happy 
 
वेळापत्रक बनवा : आपल्या आयुष्यात राेज करण्याच्या गाेष्टींचे आपले वेळापत्रक ठरलेले असते. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झाेपेपर्यंत प्रत्येक गाेष्ट सवयीप्रमाणे ठरलेल्या वेळेवर हाेत जाते.त्याचप्रमाणे मुलांना दिवसातील ठराविक वेळ अभ्यासासाठी ठरवून दिला पाहिजे.त्यावेळी मुले अभ्यास करत आहेत याकडे आपण लक्ष देणे गरजेचे असते. मुले अभ्यास करत असताना घरात टीव्ही चालू असणे किंवा इतरांच्या गप्पा चालू असणे याेग्य नाही.
 
टीव्हीवर मर्यादा: आज टीव्हीप्रमाणेच मुले माेबाईल, संगणक-लॅपटाॅप, टॅब हाताळत असतात. अशा प्रकारे मुले सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्क्रीनला चिकटून असतात आणि मग व्हिडीओ गेम्स, माेबाईल गेम्स, सीरियल असा सगळा वेळ वाया जात असताे. सतत त्यांचे लक्ष विचलित हाेत असते किंवा अभ्यास साेडून बाकी सगळ्या गाेष्टींचे आकर्षण वाढत असते. त्यामुळे या सगळ्या गाेष्टी केव्हा आणि किती वेळ हाताळायच्या याचे वेळापत्रक आखून द्या.
 
मुलांना वाचून दाखवा, वाचनाची गाेडी लावा: मुलाला वाचता येत नसते तेव्हापासून त्याला वेगवेगळ्या पुस्तकातील गाेष्टी वाचून दाखवा. नंतरही मुलांना वर्तमानपत्रातील किंवा मासिकांमधील प्रेरणादायी मजकूर किंवा जगणे समृद्ध करणाऱ्या, तात्पर्य सांगणाऱ्या गाेष्टी वाचून दाखवा. त्यातूनच त्यांना नवे शब्द, त्यांचे अर्थ, वाक्प्रचार, म्हणी यांची ओळख हाेते.वाचनाची आवड निर्माण हाेते. आपण पुढाकार घेतल्याशिवाय मुलांमध्ये चांगले गुण विकसित हाेत नाहीत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे.
 
मुलांशी गप्पा मारा: मुलांना गप्पांमधून सगळ्या गाेष्टींची जाणीव करून द्या. कष्ट म्हणजे काय, करिअर कसे घडते, पैसा कुठून येताे या सगळ्या गाेष्टी त्यांना सकारात्मक पद्धतीने सांगून मग अभ्यास करणे आणि त्याबराेबरच विविध काैशल्ये विकसित करणे कसे आवश्यक असते हे त्यांच्या मनावर बिंबवा. नुसता सतत अभ्यासाचा गजर केला तर मुले आपण सांगितलेले मनावर घेत नाहीत. उलट काहीवेळा बंडखाेर वृत्ती दाखवून देतात.
 
हाेय आणि नाही केव्हा म्हणायचे?: मुलांच्या आग्रहाला, हट्टाला आणि भावनांना बळी पडायचे किंवा नाही, याचा निर्णय पालकांनी त्यावेळची परिस्थितपाहून घ्यायचा असताे. नेहमीच मुलांनी काही म्हटले की त्यांना नाही म्हणून गप्प बसवणे याेग्य नसते तसेच त्यांनी मागितले की लगेच त्यांना हवी ती गाेष्ट खरेदी करून देणे हे देखील याेग्य नसते. यामध्ये याेग्य ते संतुलन साधणे आवश्यक असते.
 
बक्षीस आणि शिक्षा: कुटुंबात किंवा घरात काय मान्य हाेते आणि काय मान्य हाेत नाही याची मुलांना कल्पना असणे आवश्यक असते. त्यांना त्याची जाणीव तुमच्या वागण्याबाेलण्यातून हाेत जाते.जेव्हा मुलाची परीक्षेत किंवा स्पर्धेत चांगली कामगिरी हाेते तेव्हा निश्चितपणे त्याचे काैतुक केले पाहिजे आणि त्याचबराेबर त्याच्या आवडीची गाेष्ट सरप्राईज म्हणून त्याला दिली पाहिजे. त्याउलट त्याच्या गैरवर्तनाची, बेशिस्तीची देखील जाणीव त्याला करून देणे आवश्यक असते.त्यासाठी शारीरिक शिक्षेपेक्षा माैन, काही गाेष्टींसाठीचा ठाम नकार अशा गाेष्टींचा अवलंब करावा.
 
सकस आणि पाैष्टिक आहार: मुलांची बाैद्धिक वाढ चांगली हाेण्यासाठी त्यांची शारीरिक वाढ व हालचाली वेगवान हाेणे गरजेचे असते. त्या दृष्टीने मुलांना शक्यताे ताजे आणि गरम अन्न द्यावे. जंकूड किंवा तळलेल्या गाेष्टींपेक्षा त्यांच्या पाेटात सकस आणि पाैष्टिक आहार कसा जाईल, याकडे लक्ष देण्याची गरज असते. हे हाेण्यासाठी सकस व पाैष्टिक आहार अधिक चविष्ट आणि स्वादिष्ट कसा हाेईल हे पहावे लागते. विविध भाज्या व डाळींचा वापर करून केलेले पदार्थ मुलांच्या पाेटात जायला हवेत.
Powered By Sangraha 9.0