अंतराळाला गवसणी घालणारी कंपनी

07 Nov 2024 22:27:33
 

space 
 
जगातील सर्वांत श्रीमंती व्यक्ती म्हणून एलाॅन मस्क यांची ओळख आहे. ते केवळ श्रीमंतच नसून कल्पकही आहेत. त्यांच्या डाेक्यातून सतत नवनव्या भव्य कल्पना येत असतात. केवळ कल्पना रंगवून ते शांत बसत नाहीत, तर त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आकाश पाताळ एक करतात. स्पेसएक्स ही त्यांचीच अशी अद्भुत कल्पना आहे. स्पेस एक्सप्लाेरेशन टेक्नाेलाॅजीज काॅर्पाे रेशन अर्थात स्पेसएक्स म्हणून व्यापार करणारी ही एक खासगी अमेरिकन अंतराळ सामग्री निर्माता आणि अंतराळ वाहतूक सेवा कंपनी आहे. मस्क यांनी 6 मे 2002 मध्ये मंगळ माेहीम सक्षम करण्यासाठी, तसेच अंतराळ वाहतूक खर्च कमी करण्याच्या उद्दिष्टाने याची स्थापना केली. स्पेसएक्सने आजवर अनेक प्रक्षेपण वाहने आणि ड्रॅगनसारखे अंतराळ यान विकसित केले आहे.
 
स्पेसएक्स ही अंतराळ क्षेत्रातील जगातील पहिली खाजगी कंपनी आहे जिच्याकडे अनेक प्रकल्पाचं श्रेय जाते. त्यांनी 2008 साली सर्वप्रथम खासगी अनुदानित लिक्विड-प्राेपेलेंट राॅकेट यशस्वी रित्या अवकाशात साेडले. 2010 साली ड्रॅगन हे स्पेसक्राफ्ट यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे 2012 साली यशस्वीरित्या अवकाशयान पाठवणारी ही पहिली खासगी कंपनी ठरली.2020 मध्ये अगदी अलीकडेच नासाचे अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकांवर यशस्वीरित्या पाठवणारी पहिली खासगी कंपनी ठरली. मस्क यांनी स्पेसएक्सच्या स्थापनेची व मंगळावर ग्रीन हाऊस आणि झाडं लावण्याची कल्पना 2001 मध्ये मांडली हाेती.
 
सुरवातीला रशियाकडून कमी किंमतीत राॅकेट खरेदी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; पण त्याला यश मिळालं नाही. त्यामुळे स्वतःच कमी किमतीत राॅकेट निर्मिती करायची हा विचार त्यांनी केला. साेफ्टवेअर, हार्डवेअर, एकूण लागणारे राॅ मटेरियल या सगळ्याचा हिशाेब करून या प्रवासाला सुरुवात झाली. पहिल्यापासूनच साधारण सत्तर ट्न्नयांपर्यंतचा फायदा प्राप्त करत कंपनीची यशस्वी वाटचाल चालू झाली. मस्क यांनी राॅकेट अभियंते टाॅम मूलर यांच्या साथीने एका गाेदामसदृश जागेत सुरू केली स्पेसएक्स. 2005 साली 160 कर्मचारी साेबत घेऊन काम करणारी ही कंपनी आज घडीला अंदाजे दहा हजार कर्मचारी बराेबर घेऊन यशाची शिखरे गाठत आहे.
Powered By Sangraha 9.0