शाळेत प्रथमाेपचारासाठी, आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी लागणाऱ्या साेयीसुविधा उपलब्ध कराव्यात; तसेच शाळांत संबंधित प्राधिकरणांच्या मानकांनुसार आजारी विद्यार्थ्यांना तातडीची वैद्यकीय व्यवस्था करण्यासाठी फर्स्ट एड किंवा सिक रूम उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना दिले आहेत.राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व शाळांत राेज किमान सहा ते सात तास विद्यार्थी उपस्थित असतात. या कालावधीत काही विद्यार्थ्यांना तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासू शकते. अशावेळी शाळेच्या नजीक वैद्यकीय सुविधा असेलच असे नाही. त्यामुळे अशा स्थितीत शाळा प्रशासनाने समयसूचकता दाखवून तातडीने आवश्यक कार्यवाही केल्यास विद्यार्थ्याला वैद्यकीय मदत मिळून अप्रिय घटना टाळता येतील.
विद्यार्थ्यांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी सहकाऱ्यांनी त्याबाबतीत नेहमी सजग असणे आवश्यक आहे कृत्रिम श्वासाेच्छ्वास, कृत्रिम वायुजिवन व इतर तातडीचे प्रथमाेपचार देण्याबाबत शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात यावे. शाळेनजीक उपलब्ध असलेली शासकीय रुग्णालये, शासकीय आराेग्य केंद्र, खासगी दवाखाने आणि शासकीय व सार्वजनिक रुग्णवाहिकांचे संपर्क क्रमांक ठळक अक्षरात दर्शनी भागात लावण्यात यावेत व त्यांच्याशी समन्वय ठेवावा.आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी शाळेत आवश्यकतेनुसार समन्वयक नेमावेत. आपत्कालीन स्थितीत या समन्वयकाने रुग्णास तत्काळ उपचार मिळण्याच्या दृष्टीने रुग्णालयांशी संपर्क साधावा व आजारी विद्यार्थ्यांस रुग्णालयात भरती करण्यात मदत करावी.
शाळेने नजीकच्या दवाखान्यांशी; तसेच जवळपासच्या डाॅक्टरांशी ऑन काॅल सेवा उपलब्ध करून देण्याबाबत सामंजस्य करार करावेत. विद्यार्थ्यांना गरजेनुसार डाॅक्टर ऑन काॅल सुविधा उपलब्ध द्यावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.आपत्कालीन स्थितीत विद्यार्थ्यांना रुग्णालयात नेण्याची गरज भासल्यास शाळेकडे वाहनाची व्यवस्था असावी.तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक आराेग्य चांगले ठेवण्यासाठी समुपदेशकाची व्यवस्था करावी, या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत संचालक, उपसंचालकांनी मासिक आढावा घ्यावा व आवश्यकतेनुसार शिक्षणाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना मागदर्शन करणेही बंधनकारक आहे.