ईव्हीएममध्ये गडबड असण्याची शक्यता : रोहित पवार

    29-Nov-2024
Total Views |
 
 
ro
 
पुणे, 28 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
आम्ही सत्तेत आलो नाही म्हणून आम्ही नाराज आहोत असे नाही. महायुतीला सहजपणे कौल जाईल हे कोणी स्वीकारण्यास तयार नाही. ईव्हीएममध्ये गडबड असण्याची शक्यता आहे. टपाली मतदान आणि ईव्हीएममध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतांमध्ये मोठी तफावत दिसून येत असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केला. रोहित पवार म्हणाले, ‌‘महाविकास आघाडी काही झाले तरी 124 ते 130 जागा जिंकेल, असा आमचा अंदाज होता. परंतु, इतक्या सहजपणे महायुतीला कौल जाईल हे कोणी स्वीकारायला तयार नाही. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला 74 लाख मतदान वाढले आहे. ईव्हीएममध्ये गडबड असण्याची शक्यता आहे.
 
निवडणूक आयोगाने आम्ही सांगू ती मशीन कॅमेऱ्याच्या निगराणीखाली उघडावित. आमच्या तज्ज्ञांच्या उपस्थितीत चिकित्सा व्हावी. निवडणूक आयोगाने आमची शंका दूर करावी. आम्ही रडीचा डाव खेळत नाही. हिंमत असेल तर आम्ही सांगू ती मशिन्स निवडणूक आयोगाने समोर आणावीत.' मशिन्स गुजरातमधून आणल्या गेल्या होत्या, असे नमूद करीत पवार म्हणाले, ‌‘ईव्हीएम मशीनमध्ये आमची लोकशाही अडकलीय. आम्हालाही काही लोक भेटले होते, जे मतदान वाढवून देतो म्हणाले होते. पण, आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. तेव्हा ते लोक त्यांच्याकडे गेले नसतील कशावरून? तसेच टपाली मतदान आणि ईव्हीएममध्ये उमेदवारांना मिळालेल्या मतदानाच्या टक्केवारीत मोठी तफावत आहे.'
 
अजित पवार मुख्यमंत्री झाले तर चांगलेच
महायुतीने अजित पवार यांना मु्‌‍ख्यमंत्री केले तर चांगलेच असल्याचे मत रोहित पवार यांनी एका प्रश्नावर व्यक्त केले. पण, भाजपचाच मुख्यमंत्री होईल, मात्र देवेंद्र फडणवीस होतात की, मागीलवेळी तिकीट कापले, दिल्लीत जाऊन चांगले काम करणारा नेता मुख्यमंत्री होतो का ते पाहावे लागेल.