कात्रज-कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार : डॉ. राजेंद्र भोसले

29 Nov 2024 14:49:21
 
 
ka
 
पुणे, 28 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महापालिका प्रशासनाने कात्रज-कोंढवा रस्ता 84 मीटर रुंदीचा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. भूसंपादनातील अडचणींमुळे सध्या 50 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्याच्या कामास प्राधान्य दिले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. शहराच्या दक्षिण भागातील वर्तुळाकार कात्रज-कोंढवा रस्ता मागील काही वर्षांपासून चर्चेच्या स्थानी आहे.
 
केंद्र शासनाने या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला असून, हा रस्ता 84 मी. रुंद दर्शविण्यात आला आहे. परंतु, भूसंपादनातील अडचणी आणि सध्या रस्त्यावर होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने 50 मी. रुंदीच्या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रुंदीकरणासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने महापालिकेला 140 कोटी रुपये देखील दिले आहेत. त्यामुळे सध्याच्या 50 मी. रुंद रस्त्यासाठीचे ऐंशी टक्के भूसंपादन आटोक्यात आले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदर रस्त्याची रुंदी 84 मीटर करावी, अशी सूचना केली होती. रस्त्याच्या कामाचा खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येईल.
 
महापालिकेने केवळ भूसंपादन करून द्यावे, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे. त्यांच्या सूचनेनुसार महापालिकेने आता सदर रस्त्याचे 84 मीटर पर्यंत रुंदीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली. भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आवश्यक ती प्रक्रिया केली जाणार आहे. 84 मीटर रुंदीकरणासाठी सुमारे 17 हजार 200 चौरसमीटर जागा आवश्यक आहे. त्या जागेच्या नुकसान भरपाईच्या मोबदल्यात सुमारे साडेतीनशे कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यातील तीस टक्के रक्कम महापालिका देईल, असेही त्यांनी नमूद केले. कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली असून, पुढील सहा महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. रस्त्याची रुंदी 84 मीटरपर्यंत वाढविण्याच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या निर्देशानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
 
ही अडचण कशी सोडवणार?
कात्रज येथील राजस सोसायटी चौक ते कोंढवा येथील खडी मशीन चौकापर्यंतच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. मात्र, पुढे कोंढवा खडी मशीनपासून मंतरवाडीपर्यंत हा मार्ग केवळ 24 मीटर रुंद आखण्यात आला आहे. कात्रज येथून 84 मी. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांसाठी पुढे केवळ 24 मी.रुंद रस्ता आखण्यात आला आहे, त्यामुळे कोंढवा खडी मशीन चौक ते मंतरवाडी दरम्यानच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. विशेष असे, की खडी मशीन चौक ते मंतरवाडी दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्याप्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. येथील लोकवस्ती वाढल्यानंतर भविष्यात वाहतुकीची मोठी समस्या होणार आहे.
 
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हा उड्डाणपूलदेखील पुढील सहा महिन्यांत पूर्ण करण्यात यावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
-डॉ. राजेंद्र भोसले, (मनपा आयुक्त)
Powered By Sangraha 9.0