कंबाेडियामधील ऐतिहासिक ख्मेर संस्कृतीच्या वास्तू असलेले जगप्रसिद्ध स्थळ म्हणजे अंकाेर टाॅनले सॅप सराेवरापासून सुमारे सात किमी.अंतरावर वसलेल्या या शहरात अंकाेरथाेम व अंकाेरवाट ह्या दाेहाेंचाही समावेश हाेताे.802 मध्ये दुसऱ्या जयवर्मनने जावाच्या शैलेंद्र राजांची सत्ता झुगारून कंबाेडियात स्वतंत्र राज्य स्थापले व अंकाेरला लागून हरिहरालय येथे आपली राजधानी वसविली. त्याचा मुलगा इंद्रवर्मन (877-899) ह्याने अंकाेरची स्थापना केली व त्याचा मुलगा यशाेवर्मनने शहर पूर्ण केले.दहा लाख लाेकवस्तीला पुरेल इतक्या सुमारे 409 हेक्टर जागा व्यापणाऱ्या या शहराभाेवती मजबूत भिंती हाेत्या. शहरात सुमारे 600 देवळे,अनेक राजवाडे,पूल इ. उत्तम वास्तू बांधल्या हाेत्या. शहरापासून दाेन किमी.
अंतरावर नंतर अंकाेरवाटाची स्थापना केली गेली. शहराचे मूळ नाव यशाेधरपूर, परंतु ख्मेर भाषेत राजधानीला थाेम व नगर या संस्कृत शब्दांचा अपभ्रंश अन्गरअंगर-अंकाेर हाेऊन अंकाेरथाेम ह्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. ख्मेर संस्कृतीच्या उतरत्या काळात मूळची ब्रह्मा,शिव इ. हिंदू देवळे बुद्धाची मंदिरे बनली. थायलंडकडून वारंवार हल्ले हाेऊ लागल्याने पंधराव्या शतकाच्या शेवटी ख्मेर राजांनी आपली राजधानी नाॅम पेन्ह येथे नेली व अंकाेर जंगलमय झाले. या पुरातन वास्तूंचा शाेध प्रथम हेन्री माेहाैत या फ्रेंच अभियंत्याला 1860 साली लागला. आज ते जगातील प्रेक्षणीय स्थळ बनले आहे.बाराव्या शतकामध्ये सूर्यवर्मन (दुसरा) (1113 ते 1150) गादीवर बसला. त्यानं एका विराट मंदिराच्या निर्माणाचं कार्य हाती घेतलं. यामध्ये त्याला दिवाकर पंडित या राजपुराेहिताचं माेठं सहकार्य लाभलं. हे देऊळ पूर्ण करायला सुमारे 35 वर्षे लागली. या ठिकाणी राेज एक लाख लाेक कामाला येत हाेते. हा स्थापत्याबराेबर व्यवस्थापनातलासुद्धा माेठाच चमत्कार म्हटला पाहिजे.
या देवळाभाेवती आधी सव्वा किलाेमीटर लांब आणि तेवढाच रुंद, तसेच सुमारे 200 मीटर रुंद आणि 30 फूट खाेल असा प्रचंड खंदक खाेदण्यात आला. याच्यातून सुमारे 15 लाख ट्रक इतकी लाल माती काढण्यात आली. या खड्ड्याला आतून जांभा दगड आणि त्यावर बाहेरून वालुका पाषाण लावून चाैथरे बनवत ते मंदिर बांधण्यात आलं. मंदिराच्या मुख्य चाैथऱ्याची लांबी-रुंदी प्रत्येकी 60 मीटर आणि उंची 15 मीटर आहे. याच्या आतही लाल माती आहे. या चाैथऱ्याच्या भाेवताली 60 मीटर उंचीची चार आणि मध्यभागी 67 मीटर उंचीची उत्तुंग शिखरं बांधण्यात आली. या प्रचंड खंदकात साठलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चाैथऱ्याखालची वाळू सतत ओली राहते. त्यामुळे बांधकामासाठी अयाेग्य असणाऱ्या भुसभुशीत जमिनीवरही हा प्रचंड डाेलारा गेल्या 1000 वर्षांपासून टिकून आहे.