दीपावलीपासून आपल्याकडे पर्यटनाचा हंगाम सुरू हाेताे.हिवाळा सुरू हाेण्याचा हाच काळ असताे आणि प्रारंभी ताे सुखद असल्याने लाेक सहकुटुंब बाहेर जातात. काळानुसार पर्यटनात अनेक बदल झाले आणि नव्या संकल्पनाही आल्या. ग्रामीण पर्यटन किंवा रूरल टुरिझम हा सध्याचा मागणीतील ट्रेंड आहे. ग्रामीण भागात जाऊन राहणे, तेथील स्थानिक स्थळे पाहणे, तेथील नागरिकांची जीवनशैली आणि संस्कृती समजून घेणे आणि स्थानिक पदार्थ खाऊन पाहणे यात येते. यात एखाद्याच्या घरी राहण्याची संधीसुद्धा मिळते. ठरावीक साच्याच्या पर्यटनापेक्षा हा वेगळा प्रकार असून, अनेकांना मानसिक शांततेसाठी ताे हवा असताे. महामारीच्या काळात जीवनातील अस्थैर्याची जाणीव झाल्यामुळे साथ संपल्यावर हे पर्यटन वाढल्याचे दिसते.
याचा अनुभव घेतलेले लाेक यूट्यूबसारख्या माध्यमावर ते शेअर करायला लागल्याने इतरांची उत्सुकताही वाढते. नेहमीच्या पर्यटनासारखी धावपळ यात नसून, निवांत बसण्याचा अनुभव घेणे महत्त्वाचे असते. ‘स्लाे लिव्हिंग’च्या नावाने असे व्हिडिओ येतात आणि गेल्या काही काळात त्यांत चाैपट वाढ झाली आहे.शहरी भागातून येणारे पर्यटक वाढल्यामुळे ग्रामीण भागांतील नागरिकांनाही उपजीविकेचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पर्यटकांच्या राहण्या-जेवण्याची व्यवस्था करणे, त्यांना त्या परिसरातील महत्त्वाची ठिकाणे दाखविणे, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे आणि कलाकुसरीच्या वस्तूंची विक्री आदी माध्यमांतून ग्रामीण भागांत आर्थिक उलाढाल वाढते आहे. ‘सस्टनेबल डेव्हलपमेंट गाेल्स’ (एसडीजी) या कार्यक्रमातून ग्रामीण पर्यटनाला प्राेत्साहन देण्याचे काम संयुक्त राष्ट्रांनी सुरू केले असून, त्यात अनेक देश सहभागी झाले आहेत.
‘संयुक्त राष्ट्रांनी निवडलेले सर्वाेत्तम पर्यटक गाव’ ही याेजनाही 2021पासून सुरू झाली आहे. पर्यटनाच्या माध्यमातून गावांचा विकास करणे आणि तेथील संस्कृती टिकविणे असे दाेन उद्देश त्यात आहेत. यात गुजरातच्या कच्छ या जिल्ह्यातील धाेरडाे या गावाची 2023मध्ये या बहुमानासाठी निवड झाली हाेती. जगभरातील 54 गावे या यादीत हाेती आणि त्यात चीनमधील चार गावांचा समावेश हाेता. पर्यावरणाचे संवर्धन, सामाजिक जाणीव आदी निकष यासाठी असतात. सध्या जगातील 190 गावे संयुक्त राष्ट्रांच्या या कार्यक्रमात सहभागी झाली आहेत.आपला शेजारी असलेल्या चीनने ग्रामीण पर्यटनाच्या विकासाकडे गांभार्याने लक्ष देणे सुरू केल्याचे दिसते.
‘पीपल्स डेली’च्या वृत्तानुसार, ग्रामीण पर्यटनांतर्गत सरकारने यासाठी राष्ट्रीय पातळीवर 1,597 गावे आणि खेड्यांची निवड केली आह हुआंगलिंग हे त्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण खेडे असून, ‘कड्यावर लटकणारे खेडे’ अशी त्याची प्रसिद्धी आहे. सभाेवताली उत्तुंग डाेंगर असलेल्या या गावाचे निसर्गसाैंदर्यही अप्रतिम असल्याने ग्रामीण पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी तेथे गर्दी हाेते.विशिष्ट पद्धतीची शेते ही या खेड्याची एक खासियत असून, त्यासाठीसुद्धा पर्यटक येतात. आफ्रिका खंडातील देशही त्यांच्या वैविध्यतापूर्ण संस्कृतहसाठी प्रसिद्ध असल्याने तेथे असे पर्यटन वाढते आहे. त्याला प्राेत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ‘कलरफूल कल्चर्स’ हा कार्यक्रम सुरू केला असून, त्यात ग्रामीण भागातील महिला आणि तरुण कलाकारांना त्यांची काैशल्ये दाखविण्याची संधी दिली जाते.
युराेप खंडातसुद्धा ग्रामीण पर्यटन जाेर धरत असून, त्यात माेल्दाेव्हा हा देश आघाडीवर आहे. युराेपातील अत्यंत गरीब देश अशी त्याची ओळख आता या पर्यटनामुळे पुसली जायला लागली आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या गरीब असला, तरी ऐतिहासिक किल्ले, मठ, निसर्गसाैंदर्य आणि पारंपरिक पद्धतीची खेडी येथे भरपूर आहेत. त्याचा फायदा माेल्दाेव्हाला हाेत असून, पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे आर्थिक उलाढाल वाढायला लागली आहे. नेहमीच्या धावपळीतून शारीरिक आणि मानसिक विश्रांती मिळविणे हा ग्रामीण पर्यटनाचा मुख्य हेतू असताे आणि या देशात तसा निवांतपणा लाभत असल्याचा अनुभव येताे