भाजपचा आरक्षण संपविण्याचा डाव :वंचित आघाडी नेते प्रकाश आंबेडकर

    19-Nov-2024
Total Views |
 
 
bjp
 
पुणे, 18 नोव्हेंबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
भारतीय जनता पक्षाचा सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आरक्षण संपविण्याचा डाव आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. केवळ मोर्चे, आंदोलन करून चालणार नाही, तर आमदार झाल्याशिवाय विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावर आवाज उठवता येणार नाही. त्यासाठी वंचितला मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहर, जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ नाना पेठ येथे झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
 
केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपला आरक्षण संपवायचे आहे. इतर मागासवर्गाचे आरक्षण थांबविण्यात आले होते. अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) वर्गाचे आरक्षणदेखील थांबविण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअरची व्याख्या केली आहे. एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असल्यास त्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोठ्या कष्टाने राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले आरक्षण न्यायालयाच्या माध्यमातून संपविण्याचा भाजपचा डाव आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केला.
 
नोकरीमध्ये असलेल्या आरक्षणामुळे पदोन्नतीचा प्रश्न मोठा आहे. याबाबत भांडले पाहिजे. आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय उलथवून द्यावा लागेल. त्यासाठी विधानसभेत पक्षाचे आमदार असणे आवश्यक आहे. आता मोर्चे, आंदोलने करून चालणार नाही. भाजपला आरक्षण नको आहे. आरक्षण टिकविण्यासाठी जनतेने या वेळी मतदान करावे, असे आंबेडकर म्हणाले.