कोथरूडकरांची सेवा हाच ध्यास : चंद्रकांतदादा पाटील

    19-Nov-2024
Total Views |
 
ko
 
कोथरूड, 18 नोव्हेंबर (आ.प्र.) :
 
कोथरूडमधील प्रत्येक नागरिक सुखी-आनंदी राहण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असून; कोथरुरूडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असल्याचा संकल्प भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केला. महायुतीच्या प्रचारार्थ आज कोथरूडमधील गोसावीवस्ती, नवीन शिवणे भागात चौकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप कोथरूड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, प्रभाग 13 च्या अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार यांच्यासह भागातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
भाजप-महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, ‌‘कोथरूड हे कुटुंब मानून गेल्या पाच वर्षांत जी काही कामे किंवा उपक्रम कोथरूड विधानसभा मतदारसंघात राबविले; ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राबविले नाहीत. उलट सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी केले. त्यामुळे कोथरूडकरांची सेवा हाच एकमेव ध्यास असून; पुढेही कोथरूड मतदारसंघातील सेवा उपक्रम सुरूच राहणार आहेत. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुलींनाही उच्च शिक्षणाची संधी मिळावी, अशी माझी नेहमीच आग्रही भूमिका राहिली आहे. कोविडनंतर मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी लोकसहभागातून अनेक आर्थिक दुर्बल कुटुंबांतील मुलींची शैक्षणिक शुल्क भरण्यास मदत केली.
 
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा निर्णय घेतला. त्यासाठी 900 कोटींची तरतूद केली. याशिवाय कोविडनंतर अनेक बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन हातभार लावला आहे.' माजी नगरसेवक दीपक पोटे म्हणाले, ‌‘चंद्रकांतदादा पाटील हे समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व आहे. सेवा आणि समर्पण हाच त्यांचा जीवनाचा मंत्र आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक दु:खी राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. समाजासाठी समर्पित होऊन काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी आपण सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.' या वेळी भाजप कोथक्षींड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, सरचिटणीस दीपक पवार यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती देऊन चंद्रकांतदादा पाटील यांनाच मतदान करण्याचे आवाहन केले.