पुणे, 18 नोव्हेंबर (आ.प्र.) :
काँग्रेसने नेहमी व्यापाऱ्यांचा सन्मान केला आहे. काँग्रेसने व्यापाराचे विकेंद्रीकरण केले. मात्र, भाजप सरकारने व्यापाऱ्यांचे केंद्रीकरण केले आहे. भाजपने व्यापाऱ्यांना आर्थिक आतंकवादाच्या स्थितीत आणले आहे. व्यापाऱ्यांना घाबरवले जात आहे. देशातील छोटे व्यापारी सुरक्षित नाहीत. जीएसटीमुळे व्यापारी भरडला जात आहे, अशी टीका काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन यांनी केली. भाजपच्या काळात पुण्याची दुर्दशा झाली आहे. भाजपचे आमदार व्यापाऱ्यांना धमकावतात, अशीही टीका त्यांनी केली. महाविकास आघाडीचे पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रमेश बागवे, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रवींद्र धंगेकर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते.
काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या व्यापारी सेलचे अध्यक्ष भरत सुराणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यापारी आघाडीचे अध्यक्ष सरदार भोलासिंग अरोरा, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या ग्राहक संरक्षक सेलचे अध्यक्ष अरुण कटारिया आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची व्यापारी आघाडी यांच्यातर्फे गुलटेकडी येथील महावीर प्रतिष्ठानमधील पारख सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उत्तराखंडचे विरोधी पक्षनेते टी. एस. सिंगदेव, ज्येष्ठ व्यापारी देवीचंद भन्साळी, विजयकांत कोठारी, वालचंद संचेती, डॉ. जितेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रभारी शहराध्यक्ष अंकुश काकडे, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व सचिन सावंत, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, गौरव जैन आणि नितीन कदम उपस्थित होते. काँग्रेसने जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा दिला.
माजी मंत्री प्रतीक पाटील आणि अभय छाजेड यांनी यासाठी महत्त्वाचे काम केले आहे. जैन समाज संख्येमुळे नाही, तर गुणवत्तेमुळे ओळखला जातो. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांनी व्यापाराचे विकेंद्रीकरणाचे काम केले. देशात छोटे-छोटे उद्योग विकसित व्हावेत, यासाठी त्यांनी व्यापारपूरक धोरण अवलंबले, असे जैन यांनी सांगितले. भाजपने व्यापाराचे केंद्रीकरण केले आहे. चुकीच्या जीएसटी धोरणामुळे व्यापारी भरडला जात असून, काही व्यापाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, अशी टीका त्यांनी केली.