जामताडातील सायबर गुन्हे घटले, राजस्थानात मात्र वाढले

    18-Nov-2024
Total Views |
 
 
 
cyber
 
तंत्रज्ञानातील प्रगतीचा एक दुष्परिणाम म्हणजे वाढते सायबर गुन्हे. झारखंडातील जामताडा हे गाव त्यासाठी कुख्यात असून, तेथील गुन्हेगारांनी किती जणांची फसवणूक केली असेल याचा निश्चित अंदाज करता येणार नाही. मात्र, स्थानिक पाेलिसांनी या गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाई सुरू केल्यापासून जामताड्यातील गुन्हेगारी घटली आहे.झारखंडच्या सायबर गुन्हेगारी प्रतिबंधक विभागाने या वर्षात आतापर्यंत एकाही गुन्हेगाराला अटक न करणे हे त्याचे द्याेतक.पण, आता राजस्थानातील काही गावे अशा गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध हाेऊ लागल्याची माहिती पाेलीस अधिकाऱ्यांनी दिली. सायबर गुन्हे प्रतिबंधक विभागाने 2022मध्ये पाच सायबर गुन्हेगारांना अटक केली असून, यंदाच्या वर्षी आतापर्यंत 16 गुन्हेगारांना राजस्थानातून अटक करण्यात आली आहे.
 
याच परिसरात स्थानिक पाेलिसांनी अटक केलेल्या गुन्हेगारांची संख्या वेगळीच असल्याचे त्यांनी सांगितले. जामताड्याची जागा आता राजस्थानातील सायबर गुन्हेगार घेत असून, काही गावे त्यासाठी कुख्यात हाेऊ लागली आहेत. अनेकदा सगळे गावच गुन्ह्यात गुंतलेले असल्याने अटकेची कारवाई करताना पाेलिसांपुढे आव्हान उभे राहते.सायबर गुन्हेगारी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022मध्ये त्यांनी फसवणुकीसंदर्भात 680 गुन्हेगारांना अटक केली. त्यातील 287 जणांना महाराष्ट्रातून पकडण्यात आले हाेते. 56 जणांना उत्तर प्रदेशातून, 41 जणांना गुजरातमधून आणि 36 जणांना राजस्थानातून अटक केली गेली.मात्र, यंदा जामताड्यात अद्याप काेणालाही अटक झालेली नाही.
 
तथापि, 2023मध्ये झारखंडातून 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. ‘महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेशासारख्या राज्यांमध्ये सायबर गुन्हेगारांच्या टाेळ्या नाहीत आणि तेथे अशी संघटित गुन्हेगारीसुद्धा फार माेठ्या प्रमाणात नाही. पण, राजस्थानातील चित्र वेगळे आहे. एखाद्या सायबर गुन्ह्यात पूर्ण गावच गुंतल्याची उदाहरणे येथे दिसतात.अशा गावांत तपास आणि कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थ तीव्र विराेध करतात किंवा तपासात सहकार्य करत नाहीत,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दुसरा एक अधिकारी म्हणाला, ‘गेल्या काही वर्षांच्या तुलनेत राजस्थानातील संशयितांच्या अटकेचे प्रमाण वाढले आहे. भरतपूर, नूह आणि मेहवाडबराेबरच जाेधपूर आणि जयपूरसारख्या शहरांत सायबर गुन्हेगारी जास्त आहे.
 
या परिसरातील तरुणांनी हाच मार्ग उपजीविकेसाठी निवडला आहे.’ राजस्थानातील सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती वेगळी असल्याचे दिसते. भरतपूर, मेहवाड आणि नूहमधील गुन्हेगार त्यांनी शाेधलेल्या बळींना फाेन करून भुलवितात, तर जाेधपूर-जयपूरमधील गुन्हेगार बनावट खाती (म्यूल अकाउंट्स) उघडतात. ‘गावांमधील गुन्हेगार बळींना फाेन करून पैशांची फसवणूक करतात आणि शहरांतील गुन्हेगार ही रक्कम अन्य खात्यांत वळवितात. एटीएमची साेय असलेल्या शहरांतून राेख रक्कम काढली जाते. ग्रामीण आणि शहरी पातळीवरील हे गुन्हेगार हातमिळवणी करून गुन्हे करतात,’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. एका नागरिकाची आर्थिक फसवणूक केल्याच्या आराेपावरून कालाचाैकी पाेलिसांनी यंदाच्या मार्चमध्ये एका गुन्हेगाराला अटक केली.
 
संबंधिताला काॅल गर्ल पुरविण्याचे आमिष दाखवून या गुन्हेगाराने पैसे उकळले हाेते. या संदर्भात एफआयआर दाखल झाल्यावर केलेल्या तपासात हा गुन्हेगार राजस्थानातील बांकाेडा या गावातून अशी फसवणूक करत असल्याचे आढळले. गुन्ह्याच्या तांत्रिक तपासात गुन्हेगाराने एटीएम कार्ड वापरून पैसे काढल्याचे निष्पन्न झाले.पाेलिसांनी संबंधित बँकेकडून सीसीटीव्ही फुटेज मागवून तपासणी करत महेंद्र पाटीदार या गुन्हेगाराला अटक केली. हा गुन्हेगार आदिवासीबहुल बांकाेडा या गावात राहणारा असल्याने त्याला अटक करणे हे आव्हान हाेते.अखेर 70पेक्षा जास्त हाॅटेल्सची तपासणी केल्यानंतर त्याला पकडण्यात यश आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
 
महेंद्रच्या ठावठिकाणाची खात्री करण्यासाठी पाेलिसांनी झाेमॅटाेचे डिलिव्हरी एजंट असल्याचे साेंग वठविले हाेते. ते उपयाेगी पडून महेंद्रला अटक करण्यात यश आले. बळीचा विश्वास मिळविण्यासाठी महेंद्र पाटीदार हा 500 ते एक हजार रुपयांच्या रकमेची फसवणूक करत असे. काॅल गर्ल पुरविण्याचे आमिष दाखवून आपण एकाची 500 रुपयांची फसवणूक केल्याचे त्याने कबूल केले आहे.त्याच्याकडून तीन माेबाइलफाेन्स आणि नऊ सीम कार्डे पाेलिसांनी जप्त केली आहेत. महेंद्रला अटक केल्यामुळे पुढील संभाव्य फसवणुकी टळल्याचे पाेलिसांनी सांगितले. ग्रामस्थांच्या असहकार्यामुळे स्थानिक पाेलिसांना मात्र अशा गुन्हेगारांना पकडण्यात अडचणी येतात. ‘गुन्हेगारांना पकडण्यासाठी आम्हाला तीन ते दहा मिनिटे वेळ पुरताे. पण, त्यांचे साथीदार त्यांना आधीच सावध करतात.