आई-वडिलांचा काडीमाेड मुलांसाठी दु:खदायक

    17-Nov-2024
Total Views |
 
 

divorce 
 
पतीपासून विभ्नत झालेली महिला स्वत:च्या नावापुढे आपल्या पित्याचे आडनाव लावण्यास सुरुवात करते पण मुलाने आपल्या वडिलांचे आडनाव लावलं तर त्याची चर्चा हाेते आणि काढलं तरी लाेक चर्चा करतातच. अशावेळी सेलीब्रिटीझच्या मुलांच्या आयुष्यावर तर हजाराेंच्या नजरा असतात. साेशल मीडियामुळे अशा मुलांच्या आयुष्यात डाेकावणं आणि गाॅसिप करणं साेपं झालं आहे.आडनाव म्हणजे नाव जिथे आडनाव तिथे वेगळे स्थान.समाजात नावासाेबत आडनावाला फारच महत्त्वाचे स्थान असते. नाव एकसारखे असू शकते पण आडनावामुळे वेगळी स्वतंत्र व्यक्ती म्हणून समाजात वेगळी ओळख प्राप्त हाेत असते.आडनावाचा उगम व्यक्ती वा त्या व्यक्तीच्या पूर्वजांचा व्यवसाय, प्रदेश, गाव, राजकीय सत्ता इ. गाेष्टींवरून हाेत असताे. आडनावे कुळाच्या ओळखीसाठीची संज्ञा, आडनाव, गाेत्र, स्वतंत्र ओळख म्हणून पाहिली जातात.
 
आडनावामुळे व्यक्तीची जात, कूळ, गाेत्र, धंदा, मूळ स्थान इ. सांगण्यासाठी असताे. आपल्या देशामध्ये नावासाेबत जातही लिहिली जाते. आडनाव जातीचेच उपनाम आहे.व्यक्तीची संपूर्ण ओळख प्राप्त करून घ्यायची असेल तर नावासाेबत आडनाव जाेडण्याची रुढी परंपरेने चालत आली आहे. तसेच मुलांच्या नावानंतर वडिलांचे आडनाव लिहिण्याचा अव्यक्त रिवाज रूढ आहे.पित्याचं आडनाव नसणं याचा अर्थ पित्याची ओळख नसणे असा हाेत असताे. याविषयी सत्यकाम जाबालीची कथा आहे. सत्यकामाची आई जाबाली वेश्या हाेती.त्यामुळे आपल्या मुलाचा पिता नक्की काेण असेल याची तिला माहिती नव्हती. बाळ सत्यकाम वेदाचे ज्ञान घेण्यासाठी गाैतम ऋषीकडे घेण्यास गेला.
 
तेव्हा त्याला सर्वप्रथम त्याच्या पित्याचे नाव, कूळ व आडनाव विचारले गेले. तेव्हा त्या बालकाने निडरपणे सांगितले हाेते की, मला माझ्या वडिलांविषयी काहीच माहिती नाही. माझ्या आईचं नाव जाबाली आणि माझे नाव सत्यकाम आहे. गुरू त्याची नीडरता आणि सत्यप्रियता पाहून खूश झाले आणि माेठा झाल्यावर ताे बालक ऋषी सत्यकाम जाबाली म्हणून ओळखला गेला.आधुनिक काळात डिव्हाेर्स घेणाऱ्यांची मुलेच वडिलांचे नाव दूर करून त्या कारणामुळे उद्भवणाऱ्या चाैकशा आणि लाेकांच्या नावडत्या प्रतिक्रियांपासून दूर राहतात.आई-वडील वेगळे झाल्यानंतर जेव्हा मूल वडिलांचे आडनाव ऐकते तेव्हा त्याला आई-वडिलांमध्ये झालेल्या कलहाच्या कटू आठवणी सतावू लागतात.
 
याच कारणामुळे ताे वडिलांचे आडनाव दूर करून या सर्व गाेष्टींपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न करताे. घटस्फाेटाच्या माेठ्या प्रमाणातील प्रकरणांमध्ये मुलाला आई दु:खी-कष्टी झाल्याचे पाहून त्याच्या बालमनावर मातेचे शाेषण वा तिच्यावर झालेले अत्याचार काेरले जात असतात.यामुळे ताे इतर मुलांसाेबत हसून खेळून राहू शकत नाही व त्यांच्या घरी जाण्याचे टाळत राहताे. स्वत:चे विस्कटलेले कुटुंब पाहून त्याचा कुटुंबसंस्थेवरील विश्वास उडून जाताे मुलाच्या मनात नात्यांबाबत सतत संभ्रम राहताे आणि ताे स्वत:च्या आयुष्यातून निघून गेलेल्या पित्यासाेबत त्यांच्या आडनावापासूनही कायमची मुक्ती मिळवताे.