पर्यटनाच्या उत्साहावर अंकुश ठेवण्याची गरज

07 Oct 2024 12:39:21
 
 
 

tourism 
दैनंदिन जीवनातील साचेबद्धपणातून विरंगुळा मिळविण्याचा मार्ग म्हणून पर्यटनाकडे पाहिले जाते. काेणी देशातल्या देशात तर काेणी परदेशांत फिरायला जातात. वेगळी संस्कृती आणि प्रदेश त्यातून अनुभवता येतात. सध्याच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे घरबसल्या प्रवासाची सर्व व्यवस्था करता येते. विमानरेल्वेच्या तिकिटांपासून हाॅटेलच्या आरक्षणांपर्यंत सर्व कामे स्मार्टफाेनवर हाेत असल्याने लाेकांचे पर्यटनही वाढले आहे. राेजगारवृद्धीच्या दृष्टीने ते चांगले असले, तरी त्याचे वाईट परिणामही समाेर येऊ लागले आहेत. जबाबदार पर्यटन ही संकल्पना आपल्याकडे अजून फार रुजलेली नसल्याने काही बेशिस्त लाेकांच्या वर्तणुकीचा त्रास इतरांना हाेताे. सार्वजनिक सुटी अथवा वीकेंडच्या दिवशी माेठ्या संख्येने लाेक बाहेर पडत असल्यामुळे रस्त्यांवर काेंडी हाेणे नित्याचे झाले आहे. शिवाय एवढ्या गर्दीचा ताण पडून निसर्ग आणि पर्यावरणाची हानी हाेते ती वेगळीच.
 
एखाद्या छाेट्या गावाला एवढ्या लाेकांची साेय करणे श्नय नसल्याने गैरसाेयच जास्त हाेते. हे सर्व पाहता, पर्यटनाच्या अतिउत्साहाला आवर घालण्याची गरज तज्ज्ञ व्यक्त करायला लागले आहेत.काेराेना महामारीचा काळ (2020) डाेळ्यांपुढे आणा. वाढत चाललेला संसर्ग राेखण्यासाठी सरकारने लाॅकडाउनचा कडक उपाय अमलात आणल्यामुळे लाेक घरांतच बसून हाेते. सार्वजनिक आणि खासगी वाहने जागेवर उभी असल्यामुळे रस्ते रिकामे हाेते आणि हवेचे प्रदूषण कमी झाले हाेते. रस्त्यांवरील झाडांवर असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाशिवाय कसला आवाज नव्हता.सगळीकडे कसे शांत हाेते. निसर्गाला त्याची हानी भरून काढण्यासाठी वेळ मिळत असण्याचा हा काळ हाेता. याच काळात लाेकांना जीवनातील अनिश्चिततेची जाणीव हाेऊन कुटुंबाचे महत्त्व समजले.
 
रात्री घरातून दिसणारे ताऱ्यांनी भरलेले आकाश आणि दिवसा स्वच्छ निळे आकाश अनेकांनी खूप वर्षांनी पाहिले असेल. हा काळ वेगळाच हाेता. पण, काेराेनावर लस आल्यामुळे चित्र परत बदलले.लसीकरणामुळे आणि नंतर निर्बंध शिथिल झाल्यावर लाेकांचे दैनंदिन जीवन पुन्हा सुरू झाले. पर्यावरणाच्या रक्षणापेक्षा महामारीने झालेले आर्थिक नुकसान भरून काढणे महत्त्वाचे हाेते आणि घरात फार काळ बसावे लागल्यामुळे बाहेर जाण्याची ओढही लागली हाेती. त्यातून पुन्हा पर्यटन वाढायला लागले. प्रत्येकाला आता ‘ड्रीम हाॅलिडे’ची गरज वाटायला लागली. वाढते तापमान, वितळत चाललेल्या हिमनद्या आणि चक्रीवादळांच्या रूपाने निसर्ग आपल्याला इशारे देत असल्याच्या बातम्या अहाेरात्र कानांवर आदळत असूनही आपल्यामध्ये फरक पडलेला नाही. काेराेना महामारीसारखे एखादे जीवघेणे संकट आल्याशिवाय आपण जागे हाेत नसल्याचा हा परिणाम आहे.
 
‘हवामानविषयक अतिरेकी घटनां’चा फक्त भारतालाच नव्हे, तर महासत्ता असलेल्या अमेरिकेसारख्या संपन्न देशालाही बसताे आहे. सगळ्या जगातच त्याचे परिणाम दिसत आहेत.अमेरिकेच्या पश्चिम भागात जंगलांना आगी लागत आहेत, तर यंदाच्या मे महिन्यात पूर्व आफ्रिकेत महापुराने थैमान घातले. समृद्ध असलेल्या युराेपातील इटलीच्या दक्षिण भागावर दुष्काळाचे सावट आहे आणि पॅरिसमधील ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावर अवकाळी पावसाने अवकृपा केली. मुसळधार पावसामुळे 30 जुलै राेजी केरळच्या वायनाड जिल्ह्यातील तीन गावे भूस्खलनात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव करून देणाऱ्या या सर्व घटना आहेत.
 
भारत हा आता जगातील सर्वाधिक लाेकसंख्येचा देश झाल्यामुळे नवीन कितीही पर्यटन स्थळे विकसित केली किंवा जुन्या स्थळांवरील सुविधा वाढविल्या, तरी वाढत्या लाेकसंख्येपुढे हे प्रयत्न अपुरे पडणार आहेत. त्यातून आधीच धाे्नयात असलेली नैसर्गिक परिसंस्था नष्ट हाेण्याचा धाेकाही आहे. आकाराचा विचार केला, तर भारत हा जगातील सातवा माेठ्या क्रमांकाचा देश आहे. रशिया हा जगातील सर्वांत माेठा देश असून, त्याच्या पाठाेपाठ कॅनडा, अमेरिका, चीन, ब्राझील आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक येताे.आपली लाेकसंख्या मात्र जगात सर्वांत जास्त आहे.स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताची लाेकसंख्या 340 दशलक्ष हाेती आणि पर्यटकांची संख्या मर्यादित असल्याने तेव्हाची पर्यटन स्थळे या पर्यटकांना सामावून घेऊ शकत हाेती. तेव्हा पर्यटनसुद्धा हंगामी हाेते. ठरावीक काळातच लाेक प्रवासाला जात असत.
 
रेल्वेच्या गाड्या मर्यादित हाेत्या आणि विमानसेवा तर फार कमी हाेती. सार्वजनिक बसची संख्या कमी हाेती आणि खासगी माेटारी माेज्नयाच हाेत्या.पण, लाेकसंख्येच्या वाढीमुळे आता प्रवासाची सर्व साधने अपुरी पडायला लागली असून, प्रत्येक पर्यटन स्थळ गर्दीने ओसंडून वाहत असल्याचे दिसते.जागेच्या कमतरतेमुळे उत्तर-दक्षिणेकडील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील भागांतून जास्त मार्गिकांचे हमरस्ते बांधले गेले.कारखाने वाढल्यामुळे वाहने माेठ्या संख्येने रस्त्यांवर आली, विजेच्या अखंड पुरवठ्यासाठी वाहत्या नद्यांवर धरणे बांधून ऊर्जेची निर्मिती सुरू झाली.त्यातून आर्थिक घडामाेडी वाढून मागणी वाढली. जवळपास प्रत्येक डाेंगर, समुद्र किनारे आणि नद्यांच्या काठांवर हाॅटेल्स आणि दुकाने उभी राहिली. मात्र, एवढे सगळे हाेऊनही आपल्या 1.4 अब्ज लाेकसंख्येला या साेई अपुऱ्या पडत असल्याचे दिसते.
Powered By Sangraha 9.0