नवरात्रीमध्ये नऊ रात्रींमध्ये देवीचा जागर केला जाताे आपल्याकडे. या काळात देवीच्या तत्त्वाची, स्त्रीवाची पूजा करत आहाेत, असा आपला आव असताे.हा आपल्या भयभीत पुरुषप्रधान समाजात शिगाेशिग भरलेला दांभिकपणा आहे.एकीकडे स्त्रीला देवी बनवून मखरात ठेवायचं, म्हणजे आदर्श वर्तनाच्या नावाखाली तिच्यावर बंधनं लादता येतात.दुसरीकडे तिला नरकाचं द्वार म्हणून सगळ्यात कमी स्तरावर लेखायचं, तिला घरकामाची बाई आणि मुलं जन्माला घालायचं यंत्र म्हणून वापरायचं, भाेगवस्तू म्हणून तिच्याकडे पाहायचं, ही आपली शतकानुशतकांची परंपरा.
त्यामुळेच नवरात्रीचे गरबा, नवरंगांच्या साड्या वगैरे देखावे दूर करून खरी प्रार्थना काय करावी लागेल ते इथे सांगितलं आहे. देवीची खरी प्रार्थना म्हणजे काेणत्याही स्त्रीभ्रूणाची गर्भात हत्या केली जाऊ नये, काेणत्याही सरस्वतीला शाळेत जाण्यापासून राेखले जाऊ नये, काेणत्याही लक्ष्मीला आपल्या नवऱ्याकडे पैशांची भीक मागायला लागता कामा नये. काेणत्याही पार्वतीचा हुंड्यासाठी बळी दिला जाऊ नये, काेणत्याही शक्तीवर शारीरिक अत्याचार, बलात्कार हाेऊ नये आणि काेणत्याही ‘काली’ची रंगरूपावरून थट्टा करून तिला फेअर अँड लव्हली वापरून गाेरे बनवण्याचा हट्ट केला जाऊ नये, तिला तिच्या रंगासह स्वीकारलं जावं भारतातली सध्याची परिस्थिती पाहता या प्रार्थनेवर तथास्तु म्हणायला देवीही कचरेल, असेच वाटते.