मसाप पिंपरी-चिंचवडची दिवाळी काव्यपहाट उत्साहात

    30-Oct-2024
Total Views |
 
 
msp
 
पिंपरी, 29 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
एकाच व्यासपीठावर प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे, संगीतकार राम कदम यांचे सुपुत्र विजय कदम, स्नुषा नीला कदम, कथक गुरू पंडित नंदकिशोर कपोते, गायक दयानंद घोटकर, गायिका जयश्री कुलकर्णी, राजश्री शहा आदी मांदियाळींनी एकत्र येऊन राम कदम यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या वैविध्यपूर्ण गाण्यांच्या झलक पेश केल्या आणि रसिकांना खिळवून ठेवले. निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड आयोजित दिवाळी काव्यपहाट आणि ‌‌‘अक्षरवेध' : संगीतकार राम कदम दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन. ‌‌‘प्रथम तुला वंदितो...' ही रचना भूषण तोष्णीवाल यांनी सादर करून काव्यपहाटची मंगलमय सुरवात केली. संगीतकार राम कदम यांच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडणारा ‌‌‘अक्षरवेध' या दिवाळी अंकाचे प्रकाशन अनुराधा मराठे व विजय कदम यांच्या हस्ते झाले.
 
त्यावेळी या मान्यवरांसोबत व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, विनिता ऐनापुरे, डॉ. रजनी सेठ उपस्थित होत्या. संगीतकार राम कदम यांना त्यावेळी ‌‌‘बुगडी माझी सांडली गं', ‌‌‘आली ठुमकत नार लचकत मान', ‌‌‘जागा रे यादवा,' ‌‌‘दे रे कान्हा चोळी लुगडी...' यासारख्या गाण्यांच्या चाली कशा सुचल्या, हे त्यावेळी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या या कलाकारांनी त्यांच्या शैलीत उलगडून सांगितले. रसिकांनी त्यांना दिलखुलास दाद दिली आणि कार्यक्रम रंगत गेला.
 
यावेळी झालेल्या ‌‌‘काव्य रंगे उष:काल संगे' या कविसंमेलनात नाशिक, सोलापूर, परभणी, तळेगाव येथून आलेल्या स्वाती कुलकर्णी, मारुती कटकधोंड, सुवर्णा मुळजकर, रश्मी थोरात या कवींसोबत हेमंत जोशी, कांचन नेवे, डॉ. मीनल लाड, रेवती साळुंके, रजनी दुवेदी, नीलिमा फाटक, मारुती, मीना शिंदे, अश्विनी कुलकर्णी, आशा नष्टे, किरण वैद्य, आत्माराम हारे, शोभा जोशी, बाळकृष्ण अमृतकर, भूषण तोष्णीवाल, काव्या गुंजाळ, प्राची देशपांडे आदींनी सहभाग घेऊन आपल्या रचना सादर केल्या. ‌‌‘संगीत' या विषयावर झालेल्या काव्य स्पर्धेत आशा देशपांडे, केतकी देशपांडे, नीलिमा फाटक, मारुती कटकधोंड, सुवर्णा मुळजकर यांना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले, तर कविसंमेलनात मान्यवरांनी वेळेवर निवडलेल्या रचनांमध्ये रश्मी थोरात, मीना शिंदे, किरण वैद्य यांना पारितोषिके देण्यात आली. जयश्री श्रीखंडे, किरण जोशी, किशोर पाटील, कोमल पाटील, श्रीकांत जोशी, नंदकुमार मुरडे, संदीप राक्षे, अजय वाणी, श्रीकृष्ण मुळे, हनुमंत देशमुख यांनी सफल संयोजन केले. किरण लाखे, सीमा गांधी, अश्विनी रानडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. समीता टिल्लू यांनी प्रश्नमंजूषा घेतली. राजन लाखे यांनी प्रास्ताविक केले.