‌‘दगडूशेठ'तर्फे 1250 रुग्णांना श्रवणयंत्रांचे वाटप

    30-Oct-2024
Total Views |
 
 
da
 
पुणे, 29 ऑक्टोबर (आ.प्र.) :
 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन (मुंबई) व ओएनजीसीच्या विद्यमाने राज्यातील 1250 ज्येष्ठ नागरिक व मुलांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. सदाशिव पेठेतील फडके हॉलमध्ये तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासह पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ज्येष्ठ नागरिक व मुले या शिबिरात सहभागी झाली होती. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिबिरात 450 ज्येष्ठ नागरिक व 800 मुलांना श्रवणयंत्र देण्यात आले. आजपर्यंत अनेक रुग्णांना श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले आहे. केवळ पुण्यातच नाही, तर अन्य शहरांतही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. यावरूनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे.
 
या शिबिरात बार्शी, सोलापूर, धाराशिवसह इंदापूर, बारामती, आंबेगाव, जुन्नर, मंचर, भोर, वेल्हा, पिंपरी-चिंचवड आदी भागांतील ज्येष्ठ नागरिक व मुलांचा सहभाग होता. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, ‌‘मुलांना ऐकायला येत नसेल तर ती केवळ ऐकू शकत नाहीत, असे नाही तर यामुळे अनेक मुले बोलायलाही शिकत नाहीत. त्यामुळे याकडे लक्ष देऊन श्रवणयंत्र विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. मुलांना ऐकायला येत नाही, हे पालकांना लवकर कळत नाही. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. जी मुले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्यांना विनामूल्य श्रवणयंत्र दिले जात आहे.'