अधिकारी की राजकारणी, नेमके कोण पाण्याचे राजकारण करत आहे?

    28-Oct-2024
Total Views |
 
 
ad
 
पुणे, 27 ऑक्टोबर (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
ऐन विधानसभा निवडणुकीत वडगाव शेरीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मतदारसंघाच्या प्रत्येक भागात पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. निवडणुकीत महापालिका अधिकारी की राजकारणी, यापैकी नेमके कोण पाण्याचे राजकरण करत आहे, असा प्रश्न उपस्थित करून पाण्यासाठी लोकशाही मार्गाने महविकास आघाडीकडून आंदोलन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी खराडीत दिला. वडगाव शेरी मतदारसंघात पाणीसमस्या निर्माण झाल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी पठारे बोलत होते.
 
या प्रसंगी माजी नगरसेवक सचिन भगत, महेंद्र पठारे, भैयासाहेब जाधव, महादेव पठारे, संजीला पठारे, आशिष माने, संकेत गलांडे आदी उपस्थित होते. पठारे म्हणाले, ‌‘वडगाव शेरीला भामा- आसखेड आणि लष्कर जलकेंद्राकडून पाणीपुरवठा केला जातो. तरीसुद्धा ऐन निवडणुकीत पाण्याचा तुटवडा का निर्माण झाला आहे, हे समजत नाही. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. नागरीकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. वडगाव शेरी, खराडी भागात पाणीप्रश्न गंभीर आहे. अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. पाणीप्रश्नासाठी महापालिका आयुक्तांना भेटलो. मागच्या आठवड्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. तेव्हापासून पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.
 
सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पाण्याच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. पाण्याचे राजकारण केले जात आहे. किमान दोन तास पाणीपुरवठा झाला पाहिजे. निवडणुकीत जाणूनबुजून त्रास दिला जातोय का, अशी विचारणा नागरिक करत आहेत. आचारसंहितेत आंदोलन करता येत नाही; पण पाणी न मिळणे हे योग्य नाही. पाणीपुरवठा व्यवस्थित झाला नाही, तर कार्यकर्ते आंदोलन करतील. नागरिकांनी आमच्याकडे यावे अन्‌‍ आम्ही तक्रारी सोडविण्यात अडकून पडावे, असा हेतू आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोहगावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाण्यासाठी किती दिवस पैसे मोजावे लागणार आहेत, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.'