आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नात 14 टक्के वाढ

    22-Oct-2024
Total Views |
 
 
li
 
मुंबई, 21 ऑक्टोबर (आ.प्र.) : 
 
देशातील आयुर्विमा क्षेत्राने ऑगस्ट 2023 मधील 30716 कोटींच्या तुलनेत सरलेल्या सप्टेंबर 2024 मध्ये 35020 कोटी रुपये पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्न संकलित केले. वार्षिक तुलनेत त्यात सुमारे 14 टक्क्यांची वाढ झाली आहे. नवीन हप्त्यापोटी उत्पन्नात आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) वाटा 20369 कोटींचा अर्थात 58 टक्के आहे. गेल्या वर्षातील याच महिन्यातील 59 टक्क्यांवरून त्यात किंचित घसरण झाली आहे. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या सहा महिन्यांत आयुर्विमा कंपन्यांच्या नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्याच्या संकलनात 19 टक्क्यांनी वाढ झाली असून, ते 1 लाख 89 हजार 214 कोटींवर पोहोचले आहे.
 
मागील वर्षीच्या याच कालावधीत ते 1 लाख 58 हजार 377 कोटी रुपये होते. ग्राहकांमध्ये विम्याबाबत जागरूकता वाढत असून, विमा खरेदीला प्राधान्य मिळत असल्याचे यातून स्पष्ट होते. नवीन विमा योजना खरेदीत वार्षिक आधारावर 45.49 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यमान वर्षात 32,17,880 विमा योजनांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी ती 22,11,680 नोंदवली गेली होती. आयुर्विमा महामंडळाला सप्टेंबरमध्ये नवीन व्यवसायाच्या पहिल्या हप्त्यापोटी 20369 कोटी रुपये मिळाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 25 टक्के वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी याच कालावधीत एलआयसीने 18126 कोटी मिळवले होते.
 
खासगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहामाही संकलनात एकत्रितपणे 12 टक्क्यांनी वाढ झाली असून, ते 73664 कोटींवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात ते 65734 कोटी रुपये होते. देशातील आयुर्विमा उद्योग नवनव्या जनविभागापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करून लक्षणीय प्रगती करत आहे. खासगी विमा कंपन्यांच्या व्यवसायात बाजारसंलग्न विमा योजनांचा (युलिप) वाटा अधिक आहे, तर एलआयसी पारंपरिक विमा योजनांवर अबलंबून आहे.